मुंबईः संगणकाने जगात क्रांती केली आहे, पण अलिकडच्या काळात या क्रांतीला जशी चांगली बाजू मिळाली आहे, तशीच एक काळी बाजूही आहे. सध्या डीपफेक तंत्रज्ञानाने (Deepfake Technology) सोशल मीडियावरील (Social Media) एखादा फोटो ओळखणे आणि तो मूळचा (Original) आहे की बनावट आहे हे कळणे आता अवघड झाले आहे. रशिया-युक्रेन युद्धाची भयानक परिस्थिती समोर येत असतानाच दुसरीकडे म्हणजेच सोशल मीडियावर मात्र आता वेगळीच चिंता निर्माण झाली आहे. रशिया-युक्रेन युद्ध सुरु झाले आणि डीपफेक व्हिडिओंच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे, त्यामुळे अमेरिकन अधिकारी आता अधिक सतर्क झाले आहेत.
डीपफेक व्हिडिओंच्या माध्यमातून युक्रेनविषयी सोशल मीडियावरुन चुकीची माहिती व्हायरल केली जात आहे. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेन टुडे या नावाखाली युद्धबाबतच्या खोट्या आणि चुकीच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. आणि त्यासाठी फेसबूक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामचा वापर केला जात आहे. संयुक्त राष्ट्र (US) संघाच्या गुप्तचर खात्याकडून हे व्हिडिओ आणि ऑडिओ हाताळले जात आहेत. यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे.
डीपफेक व्हिडिओ-ऑडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे की, यासाठी देशा देशातील अनेक माणसं काम करत आहेत. फॉक्स न्यूजच्या वृत्तानुसार फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनने या विरोधात आपली मोहीम सुरु ठेवून तंत्रज्ञान सुधारण्याचे काम करत आहे. जे व्हिडिओ आणि ऑडिओ अस्तित्वात नाहीत त्याच प्रकारचे व्हिडिओ आणि ऑडिओ तयार करण्यात आले आहेत.
फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनच्या अहवालातही अशी नोंद करण्यात आली आहे की, फेसबुक आणि ट्विटरनेही बनावट अकाऊंट गेल्याच आठवड्यात काढून टाकण्यात आली आहेत. युक्रेनियनच्या विरोधी प्रचाराला चालना देण्यासाठी डीपफेकचा वापर करून रशिया आणि बेलारूस यांच्याशी संबंधांवर परिणाम करणारे ऑपरेशन्स सुरू असल्याचे आढळले आहे.
डीपफेक व्हिडिओ हे फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग आणि यूएस हाऊस स्पीकर नॅन्सी पेलोसी यांचेही बनावट व्हिडिओ बनवण्यात आले आहेत, आणि ते प्रचंड प्रमाणात व्हायरल झाले आहे. त्यामुळे आता मूळ फोटोशिवाय ओळखणे कठीण झाले आहे.
फेसबुक आणि ट्विटरने गेल्याच आठवड्यात दोन युक्रेन अँटी-सिक्रेट ऑपरेशन्स बंद करण्यात आले आहेत. एक रशियाशी संबंधित होता तर दुसरा बेलारूसशी. त्यामुळे मूळ ऑडिओ-व्हिडिओ ओळखणे कठीण झाले आहे.
डीपफेक तंत्रज्ञान वापरुन ऑडिओ आणि व्हिडिओ तयार केले जातात. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial intelligence) वापरून हे व्हिडिओ तयार केले जातात. हे व्हिडिओ सगळे कल्पनेवर आधारित असतात. मात्र त्या माध्यमातून कोणत्याही व्यक्तीचे वेगळ्या पद्धतीचे तुम्ही चित्रण दाखवू शकता. एखाद्या व्यक्तीने कधीही ने बोलले शब्द किंवा वाक्य या तंत्रज्ञानाचा वापर करुन ते त्या त्या व्यक्तीच्या तोंडी घालू शकता. त्यामुळे मूळ व्हिडिओ कोणता आणि बनावट व्हिडिओ कोणता हे ओळखणे अवघड बनले आहे.