चॅटजीपीटी पुन्हा ठप्प! पुन्हा एकदा युजर्सना मोठा झटका, नेमकं काय सुरु आहे?
जगभरातील लाखो युजर्सना मदतीसाठी सतत साथ देणारा AI चॅटजीपीटी पुन्हा एकदा अचानक ठप्प! २०२५ मध्ये हा पहिलाच असा प्रसंग नाही, कारण याआधीही जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात चॅटजीपीटीने युजर्सला अशाच संकटात टाकलं होतं. मात्र आश्चर्याची गोष्ट म्हणजे ओपनएआयने अद्याप याचं स्पष्ट कारण जाहीर केलेलं नाही! तज्ज्ञांच्या मते, यामागचं गुपित म्हणजे वाढलेला युजर लोड आणि नव्या AI फिचर्समुळे सर्व्हरवर पडणारा ताण. विशेषतः स्टुडिओ घिबली-स्टाईल इमेज जनरेशनसारखी फीचर ही आउटेज मागचं एक गुपित कारण असू शकते.

जगभरात लोकप्रिय असलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट म्हणजेच चॅटजीपीटी पुन्हा एकदा डाऊन झाला आहे. या समस्येमुळे भारतासह अमेरिका, युके आणि अनेक देशांमध्ये युजर्स नाराज झाले आहेत. चॅटजीपीटी अचानक बंद पडल्याची माहिती सोशल मीडियावर झपाट्याने पसरली. डाउनडिटेक्टर या वेबसाईटनुसार, रात्री ७:५३ वाजता यासंदर्भातील तक्रारींची संख्या सर्वाधिक होती. त्यानंतर हळूहळू समस्यांची संख्या कमी होऊ लागली असली, तरी अनेक युजर्स अजूनही सेवा सुरळीत होत नसल्याचं सांगत आहेत.
कसला आहे हा आउटेज?
युजर्सना चॅटजीपीटी अॅप आणि वेबसाइटवरून लॉगिन होत नव्हतं, तर काही जणांना चॅटबॉट वापरताना अडचणी आल्या. जवळपास १,००० युजर्सनी या समस्यांची नोंद केली असून, यातील बहुतांश तक्रारी चॅटजवाब लोड न होणं, अॅप क्रॅश होणं किंवा अॅक्सेस बंद पडणं यासंबंधी आहेत.
कुठल्या देशात किती त्रास?
अमेरिका: ५१३ युजर्सनी समस्यांची नोंद केली. यापैकी ८४% युजर्सना चॅटबॉट वापरताना अडचणी आल्या.
युके: २३३ युजर्सनी रिपोर्ट केलं, यापैकी बहुतेक जणांना चॅटबॉटमधील संवाद चालू ठेवण्यात समस्या.
भारत: तुलनेने कमी तक्रारी — फक्त ५० युजर्सनी ही अडचण जाणवली.
या डाउनमुळे ट्विटर (आताचं X) वर युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया देणं सुरू केलं. “चॅटजीपीटी डाउन झालं… आता खरंच स्वतः विचार करावा लागेल!” अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या.
तुमच्या अडचणीचे उपाय
जर तुमच्याकडेही चॅटजीपीटी अॅप किंवा वेबसाइट चालत नसेल, तर हे करा:
1. अॅप व वेबसाइट दोन्ही तपासा
2. इंटरनेट कनेक्शन योग्य आहे का ते पाहा
3. अॅप अपडेट करा
4. OpenAI Status Page वर अधिकृत माहिती तपासा
5. काही वेळ प्रतीक्षा करा किंवा पर्यायी AI टूल्स वापरा.
चॅटजीपीटीच्या यावर्षीच्या आउटेजची ही पहिलीच वेळ नाही. याआधी २३ जानेवारी, ६ फेब्रुवारी आणि ३१ मार्च रोजी देखील ग्लोबल आउटेजचा सामना करावा लागला होता. तज्ज्ञांच्या मते, यामागे अचानक वाढलेला युजर्सचा लोड आणि नवीन AI फिचर्स यांचा हात असू शकतो.