तुम्ही दररोज पाच तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनवर घालवता? ‘हे’ आहेत तोटे
दररोज पाच तासांपेक्षा जास्त वेळ स्मार्टफोनवर घालवणाऱ्या व्यक्तींना स्थूलतेला बळी पडावं लागू शकतं, असा निष्कर्ष नुकत्याच एका संशोधनातून काढण्यात आला आहे
वॉशिंग्टन डीसी : स्मार्टफोनशिवाय (Smartphone) आजकाल कोणाचा दिवस सुरु होत नाही, आणि संपतही नाही. दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेतही आपल्यापैकी अनेक जण स्मार्टफोनला चिकटलेले असतात. पाच तासांपेक्षा जास्त काळ स्मार्टफोन वापरल्याने तुम्ही स्थूलतेला (Obesity) बळी पडू शकता, असं एका संशोधनातून समोर आलं आहे.
स्मार्टफोन वापरणाऱ्या वॉशिंग्टनमधील विद्यापीठातील काही विद्यार्थ्यांचा समावेश एका संशोधनात करण्यात आला होता. पाच तास किंवा त्यापेक्षा अधिक काळ स्मार्टफोन वापरल्याने स्थूल होण्याची शक्यता 43 टक्क्यांनी बळावते, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
तासतासभर फोनवर वेळ घालवत राहिल्यामुळे तुमच्या शारीरिक हालचाली कमी होतात. त्याचप्रमाणे फास्ट फूड, कोल्डड्रिंक्स पिण्याचं प्रमाण वाढतं. स्थूलतेसोबतच हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यताही वाढते.
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे शारीरिक हालचाल मंदावते. त्यामुळे मधुमेह, हृदयविकार, विविध प्रकारचे कर्करोग, अपमृत्यू होण्याची शक्यता वाढत असल्याचंही संशोधनात समोर आलं आहे.
‘मोबाईल हा ज्ञान, मनोरंजन, माहितीचा आकर्षक साठा आहे. त्यामुळे तरुणाईला त्याकडे ओढा वाटणं साहजिक आहे. परंतु तरुणवर्गाने आरोग्यापूर्ण सवयी सुधारण्याकडेही लक्ष द्यावं’ असं मत एसीसी लॅटिन अमेरिका कॉन्फरन्समध्ये याविषयीचं संशोधन सादरकर्त्या मिरारी मँटिला यांनी व्यक्त केलं.