Inverter AC की Non-Inverter AC ? फरक समजून घ्या आणि योग्य पर्याय निवडा !
एसी खरेदी करताना केवळ किंमत नव्हे, तर त्याचा खर्च, वीज बचत आणि तुमचा वापर किती आहे, हे पाहून निर्णय घ्या. योग्य निवड केली तर उन्हाळ्यातही थंडावा आणि बचत दोन्ही तुमच्या हातात राहील !

उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या की घरात थंडावा टिकवण्यासाठी एअर कंडिशनर हाच एकमेव विश्वासार्ह उपाय ठरतो. पूर्वी केवळ श्रीमंतांच्या घरात असणारा एसी आता प्रत्येक घराच्या गरजांचा भाग झाला आहे. मात्र एसी खरेदी करताना ग्राहकांसमोर नेहमी एक मोठा प्रश्न उभा राहतो तो म्हणजे इन्व्हर्टर AC घ्यावा की नॉन-इन्व्हर्टर? नाव एकदम तांत्रिक वाटतं, पण त्यामागचा फरक समजून घेतल्यास खिशावरचा भार कमी करता येतो आणि थंडावाही योग्य प्रकारे अनुभवता येतो. त्यामुळे निर्णय घेताना थोडा विचार करणं नक्कीच फायद्याचं ठरेल.
Inverter vs Non-Inverter — नेमका फरक काय ?
एसीच्या आत असलेल्या ‘कॉम्प्रेसर’वर सगळं अवलंबून असतं. हे यंत्र गॅस दाबून थंड हवा तयार करतं. पण इन्व्हर्टर आणि नॉन-इन्व्हर्टर एसीमधील मुख्य फरक म्हणजे या कॉम्प्रेसरच्या काम करण्याच्या पद्धतीत आहे.
नॉन-इन्व्हर्टर एसी : याचा कॉम्प्रेसर फक्त दोन स्थितीत असतो: पूर्णपणे चालू किंवा पूर्णपणे बंद! खोलीचं तापमान सेट केल्यानंतर, तेवढ्या तापमानावर पोहोचल्यावर यंत्र थांबतं आणि गरज पडली की पुन्हा सुरू होतं. ही प्रक्रिया वारंवार होते.
इन्व्हर्टर एसी : या तंत्रज्ञानात कॉम्प्रेसरचं वेग नियंत्रण स्वयंचलितपणे होते. खोली थंड झाल्यावर यंत्र पूर्णपणे बंद न होता हळूहळू कमी वेगाने चालू राहतं. तापमान वाढल्यास कॉम्प्रेसर आपोआप वेग वाढवतो. त्यामुळे स्थिर तापमान राखलं जातं.
वापर आणि खर्चावर परिणाम
1. वीज बचत : इन्व्हर्टर एसी सतत कमी वेगात चालू राहत असल्यामुळे ते तुलनेत खूप कमी वीज वापरतात. नॉन-इन्व्हर्टर एसी वारंवार चालू-बंद होत असल्यामुळे विजेचा वापर अधिक होतो. म्हणजेच, सुरुवातीला इन्व्हर्टर एसी महाग वाटला तरी लांब पल्ल्यात वीजबिलात मोठी बचत होते.
2. आवाज : इन्व्हर्टर एसी जास्त शांत असतो कारण कॉम्प्रेसर गतीने चालतो. नॉन-इन्व्हर्टर एसी मात्र सुरू आणि बंद होताना आवाज करतो.
3. आयुष्य आणि मेंटेनन्स: इन्व्हर्टर तंत्रज्ञानामुळे कॉम्प्रेसरवर कमी ताण येतो आणि त्यामुळे त्याचं आयुष्य तुलनेत जास्त असतं, मेंटेनन्स कमी लागतो.
तुमच्या गरजेनुसार निर्णय घ्या !
1. जास्त वेळ एसी वापरणार असाल — तर इन्व्हर्टर एसी हा उत्तम पर्याय आहे. दीर्घकाळ खर्च वाचवणारा आणि आरामदायी असतो.
2. वापर कमी आणि बजेट मर्यादित असेल — तर नॉन-इन्व्हर्टर एसी खरेदीचा पर्याय विचारात घेऊ शकता. पण त्याचे विजेचे बिल अधिक येईल, हे लक्षात ठेवा.