Paytm Payments Bank भारतीय ग्राहकांचा डेटा चीनला विकतेय? डेटा लीक्सच्या दाव्यांवर कंपनी म्हणते…
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) गेल्या आठवड्यात पेटीएमला (Paytm) दणका देत पेमेंट्स बँक सेवेअंतर्गत नवीन खाती उघडण्यावर तात्पुरती बंदी आणली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनूसार पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) चायनीज कंपन्यांना माहिती शेअर करत असल्याचं समोर आलं आहे.
मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) गेल्या आठवड्यात पेटीएमला (Paytm) दणका देत पेमेंट्स बँक सेवेअंतर्गत नवीन खाती उघडण्यावर तात्पुरती बंदी आणली आहे. ब्लूमबर्गच्या रिपोर्टनूसार पेटीएम पेमेंट्स बँक (Paytm Payments Bank) चायनीज कंपन्यांना माहिती शेअर करत असल्याचं समोर आलं आहे. तसेच पेटीएम पेमेंट्स बँकेत या कंपन्यांची अप्रत्यक्ष भागीदारी असून आरबीआयच्या नियमांचं हे उल्लंघन आहे. रिपोर्टमध्ये चायनीज कंपन्यांसोबत शेअर करण्यात आलेल्या माहितीच्या स्वरुपाचा उल्लेख करण्यात आलेला नाही. देशात कार्यरत असणाऱ्या सर्व पेमेंट कंपन्यांनी त्यांची व्यवहारांबाबतची माहिती लोकल सर्वरवर स्टोअर करावी असा आरबीआयचा नियम आहे. पेटीएमकडून मात्र डेटा लीकच्या या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत बोलताना पेटीएम पेमेंट्स बँकेचे प्रवक्ते म्हणाले की, ब्लूमबर्गच्या रिपोर्टमधील चायनीज कंपन्या आणि पेटीएम पेमेंट्स बँकेच्या डेटा लीकमधील दावे पूर्णपणे चुकीचे आहेत. पेटीएम पेमेंट्स बँकेला पूर्णपणे स्वदेशी बँक असल्याचा गर्व आहे आणि आम्ही डेटा लोकलायजेशन बाबत आरबीआयच्या नियमांचे पूर्णपणे पालन करतो. तसेच आमच्या बँकेचा सर्व डेटा देशातच स्टोअर केला जातो.
पेटीएम पेमेंट्स बँकेचे आरबीआयला निर्देश
गेल्या आठवड्यात आरबीआयने पेटीएम पेमेंट्स बँकेला त्रयस्थ कंपनीद्वारे आयटी ऑडिट करण्याबाबत निर्देश दिले होते. आरबीआयच्या या निर्देशात सांगण्यात आले होते की, बँक विनियम अधिनियम 1949 च्या कलम 35 अ अंतर्गत पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला तत्काळ प्रभावानूसार नवीन ग्राहक जोडण्यास प्रतिबंध करण्याबाबतचे निर्देश देण्यात येत आहेत. तसेच आयटी ऑडिटर्सच्या अहवालाबाबत आरबीआयच्या रिव्ह्यूनंतरच पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडला नवीन ग्राहक जोडता येऊ शकतात असेही आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले.
आरबीआयच्या सुचनांचे पालन करण्यात येत असून त्यासाठी योग्य पावलं उचलण्यात येत असल्याचे पेटीएमकडून सांगण्यात आले आहे. तसेच आरबीआयच्या या निर्देशाचा कंपनीच्या विद्यमान ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नसून कोणत्याही अडचणीशिवाय ते बँकिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात, असेही कंपनीने म्हटले आहे.
इतर बातम्या
Dell, MI, Samsung च्या उत्पादनांवर ग्राहकांचा विश्वास, विश्वसनीय ब्रँड्समध्ये Tata च्या 36 कंपन्या