Twitter ची मुजोरी सुरुच, भारताच्या नकाशासोबत छेडछाड, जम्मू-काश्मीर, लडाख वेगळे देश असल्याचं दर्शवलं
ट्विटर (Twitter) आणि भारत सरकार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. अशातच आता ट्विटरने एक मोठी चूक केली आहे.
नवी दिल्ली : ट्विटर (Twitter) आणि भारत सरकार यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून संघर्ष सुरु आहे. अशातच आता ट्विटरने एक मोठी चूक केली आहे, ज्याचा त्यांना फटका सहन करावा लागू शकतो. ट्विटरने भारताच्या नकाशासोबत छेडछाड केली असून जम्मू-काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांना स्वतंत्र देश म्हणून दर्शवण्याचा प्रयत्न ट्विटरने केला आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरकार या प्रकरणात कठोर कारवाई करू शकते. यापूर्वी ट्विटरने लेहला चीनचा भाग असल्याचे दर्शवले होते, त्याबद्दल सरकारने तीव्र आक्षेप नोंदवत चेतावणी दिली होती. (Jammu and Kasmir, Ladakh Outside India Map On Twitter Website)
देशातील नवीन आयटी नियम मान्य करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने त्यांच्या वेबसाईटवरील करिअर विभागात भारतीय नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवला आहे. वेबसाईटवरुन ‘ट्वीप लाइफ’ विभागात दर्शवलेल्या नकाशामध्ये जम्मू-काश्मीरला स्वतंत्र देश म्हणून दर्शवलं आहे, तर लेह हा चीनचा भाग असल्याचे म्हटले आहे.
ट्विटरने अशी चूक यापूर्वीदेखील केली आहे. एका बाजूला कंपनीचा नव्या आयटी नियमांवरुन भारत सरकारसोबत संघर्ष सुरु आहे, तर दुसऱ्या बाजूला भारताचा चुकीचा नकाशा वेबसाईटवर प्रसिद्ध केला आहे. नुकतेच भारताच्या आयटी आणि कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल एक तासासाठी ब्लॉक करण्यात आले होते. त्यामुळे केंद्र सरकार आगामी काळात ट्विटरवर कडक कारवाई करू शकते. अशाच कारभारामुळे नायजेरियात अलीकडेच या मायक्रोब्लॉगिंग साइटवर बंदी घालण्यात आली आहे.
ट्विटर इंडियाला नवीन नियमांचे त्वरित पालन करण्याबाबत केंद्र सरकारकडून अंतिम सूचना देण्यात आली असल्याचे आठवड्याभरापूर्वी सांगण्यात आले होते. या सूचनेनुसार ट्विटर या नियमांचे पालन करण्यात अयशस्वी ठरल्यास आयटी अधिनियम, 2000 च्या कलम 79 अन्वये दायित्वाची सूट मागे घेतली जाईल आणि ट्विटरवर आयटी अॅक्ट आणि भारताच्या इतर दंडात्मक कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
सरकारच्या नियमांचे पालन करण्यास ट्विटरचा नकार
यापूर्वी गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅप सारख्या दिग्गजांनी नव्या आयटी मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने वैधानिक अधिकारी नियुक्त करण्यास सहमती दर्शविली होती, परंतु ट्विटरने नियमांचे पालन करण्यास नकार दिला.
Google-Facebook नमलं
दरम्यान, गुगल (Google) आणि फेसबुक (Facebook) सारख्या बड्या डिजिटल कंपन्यांनी भारतातील नवीन सोशल मीडिया नियमांनुसार (Social Media Rules तक्रार अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यासह इतर माहिती सार्वजनिक करण्याच्या उद्देशाने आपली वेबसाइट अद्ययावत (अपडेट) करणे सुरू केले आहे.
सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार गुगल, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या (WhatsApp) बड्या सोशल मीडिया कंपन्यांनी नवीन डिजिटल नियमांनुसार माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडे (आयटी) विविध तपशील शेअर केले आहेत. तथापि, ट्विटर अद्याप नियमांचे पालन करीत नाही. नवीन नियमांनुसार बड्या सोशल मीडिया मध्यस्थांना तक्रार निवारण अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणे आवश्यक आहे. या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात होणे आवश्यक आहे आणि ते येथेच थांबून कामकाज सांभाळतील.
प्रमुख सोशल मीडिया मध्यस्थांच्या श्रेणीत त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा समावेश करण्यात आला आहे, ज्यांची युजर्स संख्या 50 लाखाहून अधिक आहे. उद्योग सूत्रांनी सांगितले की, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपने यापूर्वीच इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाकडे अनुपालन अहवाल शेअर केले आहेत. या नव्या मंचांवर नवीन तक्रार अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची माहिती अद्ययावत केली जात आहे.
गुगल, यूट्यूबने तक्रार निवारण अधिकाऱ्यांविषयी माहिती दिली
गुगलने ‘कांटेक्ट अस’ पेजवर जो ग्रिअरचे नाव दिले आहे. त्याचा पत्ता माउंटन व्ह्यू अमेरिकेचा आहे. या पृष्ठावरील यूट्यूबसाठी तक्रार निवारण यंत्रणेविषयीदेखील माहिती प्रदान केली गेली आहे. नियमांनुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना त्यांच्या वेबसाइटवर, अॅप किंवा त्या दोन्हीवर तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता द्यावा लागतो. तसेच तक्रारीची पद्धत सांगावी लागेल ज्याद्वारे वापरकर्ता किंवा पीडित आपली तक्रार करू शकतात.
इतर बातम्या
Google Photos युजर्स आणि YouTube क्रिएटर्ससाठी वाईट बातमी, ‘या’ सर्व्हिसेस बंद होणार
फेसबुक प्रमाणेच MeWe, Diaspora यासह बरेच सोशल मीडिया पर्याय उपलब्ध, जाणून घ्या याची वैशिष्ट्ये
(Jammu and Kasmir, Ladakh Outside India Map On Twitter Website)