ट्रेनमध्ये मोबाईल चोरीला गेला? टेन्शन घेऊ नका; सरकारच्या ‘या’ स्मार्ट अॅपने मिळवा तो सहज परत
रेल्वे प्रवासात मोबाईल चोरीला गेला? काय करावं सुचत नाहीये? सगळी महत्त्वाची माहिती, नंबर, फोटो गेले म्हणून हवालदिल झाला आहात? आता टेन्शन थोडं कमी होणार आहे. भारतीय रेल्वे आणि सरकारने तुमच्या मदतीसाठी एक नवीन अॅप विकसीत केलं आहे.

रेल्वेचा प्रवास म्हटलं की कधी गर्दी, कधी धावपळ आणि अशातच आपल्या खिशातला किंवा बॅगेतला मोबाईल फोन कधी गायब होतो, ते कळतही नाही. अनेकांना हा वाईट अनुभव आला असेल. मोबाईल गेला म्हणजे फक्त हजारो रुपयांचं नुकसानचं नाही, तर त्यातले आपले नंबर, फोटो, बँकेची माहिती आणि कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी! चोरीला गेल्यावर काय करावं, कुठे जावं, कुणाला सांगावं हेच सुचत नाही आणि आपण हवालदिल होतो. पण आता तुमच्या मदतीला एक नवीन सरकारी सुविधा आली आहे.
रेल्वे आणि सरकारने मिळून शोधला मार्ग!
प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन, भारतीय रेल्वे आणि केंद्र सरकारचा दूरसंचार विभाग (DoT) यांनी एकत्र येऊन एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. आता रेल्वेचं मदतीसाठी असलेलं ‘रेल मदद’ हे ॲप आणि मोबाईल ट्रॅक करणारं ‘संचार साथी’ हे पोर्टल एकमेकांशी जोडण्यात आलं आहे. यामुळे रेल्वे प्रवासात तुमचा मोबाईल हरवला किंवा चोरी झाला, तर त्यावर कारवाई करणं आणि तो परत मिळवणं खूप सोपं होणार आहे. रेल्वे सुरक्षा बल (RPF) सुद्धा या कामात मदत करणार आहे.
कशी काम करतं हे नवीन सिस्टम?
हे अगदी सोपं आहे. समजा, प्रवासात तुमचा मोबाईल चोरीला गेला किंवा हरवला, तर
1. ‘रेल मदद’ ॲप लगेच डाउनलोड करून त्यात व्यवस्थित तक्रार नोंदवायची.
2. तुम्ही तक्रार नोंदवताच, ती आपोआप ‘संचार साथी’ पोर्टलवर पाठवली जाईल.
3. ‘संचार साथी’ पोर्टलवर तुमची तक्रार पोहोचताच, तुमचा चोरीला गेलेला मोबाईल नंबर तात्काळ ब्लॉक केला जाईल. याचा मोठा फायदा म्हणजे, तुमच्या सिम कार्डचा किंवा फोनचा कुणीही गैरवापर करू शकणार नाही.
4. ब्लॉक करण्यासोबतच, तुमचा फोन नक्की कुठे आहे, हे शोधण्याचं कामही याच माध्यमातून सुरू केलं जाईल आणि संबंधित पोलीस किंवा RPF ला माहिती दिली जाईल.
हे ‘संचार साथी’ पोर्टल मुळातच हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल ब्लॉक करण्यासाठी आणि शोधण्यासाठी बनवलं आहे. इथे तुम्ही कोणत्याही सायबर गुन्ह्याची तक्रारही करू शकता. आता हे पोर्टल थेट रेल्वेच्या ‘रेल मदद’ ॲपशी जोडल्यामुळे, रेल्वे प्रवाशांना तात्काळ मदत मिळणं शक्य झालं आहे.