पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणारी अनोखी दुचाकी, मालेगावच्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग
मालेगावच्या मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणाऱ्या दुचाकीचा शोध लावला आहे (Malegaon engineering students built a vehicle running on petrol and LPG gas).
नाशिक : पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणाऱ्या अनेक चारचाकी गाड्या आपण बघतिल्या आहेत. पण पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणारी दुचाकी अजूनही रस्त्यावर धावताना दिसत नाही. मालेगावच्या मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पेट्रोल आणि एलपीजी गॅसवर चालणाऱ्या दुचाकीचा शोध लावला आहे (Malegaon engineering students built a vehicle running on petrol and LPG gas).
मन्सुरा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोहम्मद अनस, शफिक अहमद, मोहम्मद जुनेद, यमान अशहर यांनी पेट्रोल आणि एलपीजीवर चालणाऱ्या अनोख्या दुचाकीचा शोध लावला आहे. या विद्यार्थ्यांनी बनवलेली दुचाकी ही इतर दुचाकींप्रमाणेच दिसते. पण इतर दुचाकी फक्त पेट्रोलवर चालतात, तर ही दुचाकी पेट्रोलसह एलपीजी गॅसवरही चालते (Malegaon engineering students built a vehicle running on petrol and LPG gas).
“आजपर्यंत आपण पेट्रोल आणि गॅसवर चालणाऱ्या फक्त चारचाकी गाड्या बघितल्या आहेत. त्यामुळे आम्हाला सुचलं कि, चारचाकी गाडीसारखं पेट्रोल आणि एलपीजी गॅस या दोघांवर चालणारी दुचाकी तयार करावी. आम्ही त्याअनुषंगाने काम सुरु केलं. अखेर या कामात आम्हाला यश आलं”, असं गाडीची निर्मिती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सांगितलं.
“ही मिनी बाईक तयार करण्यासाठी आम्ही काही वस्तू बाजारातून विकत आणल्या, तर काही टाकाऊ वस्तू वापरल्या. पेट्रोलमुळे प्रदूषण जास्त होतं. त्यातुलनेत एलपीजी गॅसचा वापर केल्याने तो कमी होतो. देशात सध्या दिवसेंदिवस पेट्रोलचे दर वाढत असल्याने दुचाकी चालवणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर चाललं आहे. पेट्रोलच्या तुलनेत गॅस स्वस्त आहे. गॅसवर ही बाईक जास्त मायलेज देते. त्यामुळे ही दुचाकी सर्वसामान्यांना फायद्याची ठरणार आहे. ही गाडी तयार करण्यासाठी आम्हाला जवळपास 22 हजारांचा खर्च आला”, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
“मन्सुरा महाविद्यालयाच्या विद्यार्थांनी ही गाडी तयार केली, या गोष्टीचा प्रचंड अभिमान वाटतो. विशेष म्हणजे बाईकचे सर्व पार्ट्स विद्यार्थांनी स्वतः बनवले आहेत. विद्यार्थ्यांकडून अशाप्रकारच्या नव्या आयडिया येत असतील तर संस्था म्हणून त्यांना आर्थिक सहकार्य करु”, असं आश्वासन महाविद्यालयाचे प्राचार्य ए. के. कुरेशी यांनी दिलं.
दुचाकीचा वापर समाजाची प्राथमिक गरज बनली आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही घरोघरी दुचाकी आहेत. मात्र महागड्या पेट्रोलमुळे सर्वसामान्य जनतेचं कंबरडे मोडले आहे. अशावेळी मन्सूरा कॉलेजच्या मोहम्मद अनस, शफिक अहमद, मोहम्मद जुनेद, यमान, अब्दुल अजीज या विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून केलेला हा नावीन्यपूर्ण प्रयोग नक्कीच यशस्वी ठरु शकतो, अशी प्रतिक्रिया मन्सुरा महाविद्यालयाच्या शिक्षकांकडून देण्यात आली आहे.