SIM ची नाही गरज, हवे कशाला Internet, स्मार्टफोनवर तरीही पाहा व्हिडिओ
Direct to Mobile | स्मार्टफोन युझर्स लवकरच विना सिम आणि इंटरनेट कनेक्शन त्यांच्या मोबाईलवर व्हिडिओ पाहू शकतील. त्यासाठी भारत सरकारच्या डायरेक्ट टू मोबाईल ब्रॉडकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. लवकरच या 19 शहरात या तंत्रज्ञानाआधारे नागरिकांना ही सेवा मिळणार आहे. काय आहे हे तंत्रज्ञान?
नवी दिल्ली | 17 जानेवारी 2024 : Smartphone विना सिम आणि इंटरनेट विना एक बिनकामाची वस्तू ठरेल नाही का? अनेक जण वायफायचा वापर करतात. पण तो ठराविक ठिकाणीच त्याचा वापर करता येईल. पण केंद्र सरकार एक खास तंत्रज्ञान घेऊन येत आहे. त्याआधारे विना सिम, इंटरनेट विना तुम्हाला कॉल, मॅसेज आणि व्हिडिओ पाहता येईल. या तंत्रज्ञानाला डायरेक्ट टू मोबाईल असे नाव देण्यात आले आहे. ब्रॉडकास्टिंग समिट दरम्यान सचिव अपूर्व चंद्रा यांनी देशात लवकरच Direct to Mobile (D2M) ची चाचणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. सुरुवातीला देशातील 19 शहरात या सेवेची चाचपणी करण्यात येणार आहे.
व्हिडिओ ट्रॅफिक होईल शिफ्ट
D2M तंत्रज्ञानामुळे ग्राहकांना सिम, इंटरनेट नसले तरी व्हिडिओ पाहता येणार आहे. देशातील 19 शहरात या सेवेची ट्रायल घेण्यात येणार आहे. सचिव चंद्रा यांच्या दाव्यानुसार, त्यामुळे 25-30 टक्के व्हिडिओ ट्रॅफिक या नवीन D2M तंत्रज्ञानाकडे वळेल. ही देशातील डिजिटल क्रांती असेल. त्यात अजून मोठे बदल होतील. देशातील कोट्यवधी जनतेला त्याचा फायदा होईल. त्यांना ऑनलाईन ऑडिओ, व्हिडिओ कॉल करता येतील, मॅसेज पाठवता येतील.
काही शहरात अगोदरच ट्रायल
गेल्या वर्षी हा पथदर्शी प्रकल्पात, डायरेक्ट टू मोबाईल तंत्रज्ञानासाठी काही ठिकाणी ट्रायल घेण्यात आली. यामध्ये बेंगळुरु, नोएडा या शहरांचा समावेश आहे. या प्रयोगाचे निकाल उत्साहवर्धक आहे. त्यामुळे यावर्षी 19 शहरांत या नवीन तंत्रज्ञानाची चाचपणी करण्यात येत आहे. चंद्रा यांच्या दाव्यानुसार, ज्या भागात टीव्ही नाही. इंटरनेटची फ्रीक्वेन्सी व्यवस्थित नाही, अशा ठिकाणी डायरेक्ट टू मोबाईल तंत्रज्ञान पोहचेल. भारतात जवळपास 280 दशलक्ष घरं आहेत. त्यातील 190 घरांमध्ये टीव्ही आहे. तर दुर्गम, डोंगरी भागातील लोकांकडे ही सुविधा नाही. त्यांच्यासाठी हे तंत्रज्ञान उपयोगी ठरेल.
सेवेसाठी किती शुल्क
चंद्रा यांच्यानुसार, देशात 80 कोटी स्मार्टफोन युझर्स आहेत. ते 69 टक्के कंटेट केवळ व्हिडिओ फॉर्ममध्ये एक्सेस करतात. पण व्हिडिओ लोड होत असल्याने नेटवर्क स्लो होते. त्यामुळे व्हिडिओ बफरिंगची अडचण येते. डायरेक्ट टू मोबाईल ही सेवा मोफत असेल की त्यासाठी शुल्क अदा करावे लागेल, याची माहिती समोर आलेली नाही.