स्मार्टफोन, लॅपटॉप चार्ज करताना या चुका टाळा, अन्यथा बॅटरी होईल लवकर खराब!
स्मार्ट डिव्हाइसेस ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत. पण त्यांच्या बॅटरीच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणं आपल्याला महागात पडू शकतं. चुकीच्या चार्जिंग सवयींमुळे केवळ बॅटरीचं आयुष्य कमी होत नाही, तर काही वेळा आग लागण्यासारख्या गंभीर दुर्घटनाही घडू शकतात.

आजकाल आपल्या जीवनाचा मोठा भाग स्मार्टफोन, लॅपटॉप, टॅबलेट आणि स्मार्टवॉचसारख्या डिव्हाइसने व्यापलेला आहे. हे सगळं डिजिटल जग चार्जिंगशिवाय थांबू शकत नाही. पण अनेकदा आपण आपल्या डिव्हाइसना चार्ज करताना काही सवयी अंगवळणी लावतो – ज्या दीर्घकाळात त्याच्या बॅटरीच्या आयुष्याला नुकसान पोहोचवू शकतात.
या सवयी तुमचे डिव्हाइस सहज खराब करु शकतात
1. स्वस्त चार्जर : सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मूळ किंवा प्रमाणित चार्जरचाच वापर करावा. डिव्हाइससोबत मिळणाऱ्या केबल आणि अॅडॅप्टरचा वापर न करता जर स्वस्त, अनोळखी किंवा अनब्रँडेड चार्जर वापरले गेले, तर त्यातून अयोग्य वीजपुरवठा होतो. परिणामी बॅटरी खराब होऊ शकते आणि शॉर्ट सर्किटसारख्या घटनाही घडू शकतात.
2. ओव्हरचार्जिंग : ओव्हरचार्जिंग ही आणखी एक सामान्य चूक आहे. जरी नवीन उपकरणांमध्ये ओव्हरचार्जिंग प्रोटेक्शन सिस्टीम्स असल्या, तरीही डिव्हाइस रात्रीभर प्लगमध्ये लावून ठेवणं टाळावं. हे केवळ बॅटरीच्या कार्यक्षमतेवर परिणाम करत नाही, तर डिव्हाइस ओव्हरहीट होऊन नुकसानही होऊ शकतं.
3. 20% ते 80% दरम्यान चार्ज करा : बॅटरीच्या हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी फक्त 20% ते 80% या चार्जिंग लेव्हलमध्ये चार्ज करणे योग्य आहे. पूर्णपणे चार्ज करणे किंवा पूर्णपणे चार्जींग उतरेपर्यंत वाट पाहणे, या सवयी बॅटरीची हेल्थ लवकर कमी करतात. मध्यम पातळीवर चार्जिंग ठेवल्यास बॅटरी दीर्घकाळ टिकते.
4. उष्णता टाळा : चार्जिंग करताना उष्णता टाळणं अत्यावश्यक आहे. डिव्हाइस उशीखाली, पांघरुणाखाली किंवा थेट सूर्यप्रकाशात ठेवू नका. तसेच, गेम्स किंवा जड अॅप्स वापरल्यास तापमान झपाट्याने वाढतं, जे बॅटरीसाठी अत्यंत घातक आहे. गरम झालं असल्यास चार्जिंग तात्काळ थांबवा.
5. चारजींग होत असताना फोन वापरु नका : डिव्हाइसचा चार्जिंगदरम्यान अतिवापर टाळा. हलकं ब्राउझिंग किंवा मेसेजिंग ठीक आहे, पण गेमिंग किंवा व्हिडिओ एडिटिंगसारखे कार्य बॅटरीवर प्रचंड दाब टाकतात. तसेच चार्जिंग पोर्ट स्वच्छ ठेवणं, ओलाव्यापासून दूर ठेवणं – ही छोटीशी काळजीही महत्त्वाची ठरते.
6 : बॅकग्राउंड ॲप्स बंद करा: वापरात नसलेल्या ॲप्स बंद केल्यास बॅटरीचा अनावश्यक वापर टाळता येतो.
शेवटी, जर तुम्ही पॉवर बँक वापरत असाल, तर ती विश्वासार्ह ब्रँडचीच असावी.