SIM Portability : महत्वाची बातमी; 1 जुलैनंतर सिम पोर्ट करणे होईल अवघड, काय आहे अपडेट
TRAI SIM Portability : सिम कार्ड पोर्टेबिलिटीविषयी महत्वाची अपडेट समोर येत आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण एक महत्वाचे पाऊल टाकणार आहे. त्यामुळे युझर्सला आता सिम पोर्टेबिलिटी करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

सिम कार्ड पोर्टेबिलिटीविषयी एक महत्वाची अपडेट समोर येत आहे. ग्राहकांच्या सुविधेसाठी सिम पोर्टेबिलिटीची सुविधा देण्यात आली आहे. पण आता या सुविधेला लगाम लागू शकतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (TRAI-Telecom Regulatory Authority of India) सिम कार्डसंबंधी नियम कडक करण्याचे ठरवले आहे. सिमचा चुकीचा आणि गैरवापर टाळण्यासाठी आणि मोबाईल कंपन्यांच्या मनमानीला चाप लावण्यासाठी हे पाऊल टाकण्यात येत आहे. त्यामुळे आता मोबाईल युझर्सला सिम पोर्ट करणे सोपे काम नसेल.
काय आहे अपडेट
सिम कार्डविषयी ट्रायने नुकतीच एक अपडेट दिली आहे. त्यानुसार, टेलिकम्युनिकेशन मोबाईल क्रमांक पोर्टेबिलिटी रेग्युलेशनचा एक ठराव समोर आला आहे. नवीन अपडेटनुसार, आता नवीन सिम खरेदी केल्यानंतर लागलीच 7 दिवसांच्या आत ते पोर्ट करता येणार नाही. मोबाईल युझर्ससाटी सिमविषयीचे नवीन नियम 1 जुलैपासून लागू होतील. त्यानंतर तुम्ही नवीन सिम कार्ड खरेदी केले आणि लागलीच दुसरी टेलिकॉम कंपनीची सेवा घेण्यासाठी पोर्टचा पर्याय निवडला तर ते होणार नाही.




7 दिवस दम खा की राव
दूरसंचार विभागाच्या सूचनेनंतर भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने हा नियम लागू केला आहे. जर युझरचे जुने सिम खराब अथवा चोरी झाले आणि त्याने नवीन सिम खरेदी केले. तर हे नवीन सिम त्याला लागलीच पोर्ट करता येणार नाही. त्याला आता 7 दिवस सिम पोर्टसाठी वाट पहावी लागेल. 7 दिवसांचा कालावधी संपल्यानंतर ग्राहक त्याचा टेलिकॉम ऑपरेटर बदलवू शकतो.
सिमसंबंधी घोटाळ्यांवर अंकुश
सिमसंबंधीच्या घोटाळ्यांना अटकाव करण्यासाठी आणि त्यांना लगाम लावण्यासाठी हा उपाय करण्यात आला आहे. मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी आणि सिम बदल करण्याचा सातत्याने दुरुपयोग होत असल्याचे समोर आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या नवीन नियमांमुळे स्कॅमर्स आणि फसवणुकीच्या प्रकरांना आळा घालता येणार आहे. तसेच जे नवीन सिम कार्ड खरेदी करुन सर्वसामान्यांना चुना लावतात आणि सिम कार्ड फेकून देतात, अथवा सिम पोर्ट करतात, त्यांना हा दणका मानण्यात येत आहे.