भारतात मोबाईल इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या वाढली, एक व्यक्ती महिन्याला वापरतो इतका डेटा
तंत्रज्ञानाच्या युगात भारत आता वेगाने पुढे जात असून सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्यांच्या यादीत समावेश आहे. गेल्या पाच वर्षात इंटरनेट वापरण्याऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे.एवढेच नाही तर इंटरनेट सर्वात स्वस्त असलेल्या देशांच्या यादीत भारत पाचव्या क्रमांकावर आहे.
मुंबई : स्मार्टफोनच्या युगात भारतानं बरीच मजल मारली आहे. आता 5 जी नेटवर्कचं युग सुरु झालं असून सुविधाही मिळत आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यात 5 जी सपोर्ट करणारे अप्लिकेशन आणि सर्व्हिस सुरु होईल. त्यामुळे मोबाईल डेटा वापरणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढणार आहे. असं असताना गेल्या पाच वर्षातच मोबाईल डेटा वापरणाऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. 4 जी सेवा वापरणाऱ्यांची संख्या गेल्या काही वर्षात वेगाने वाढत चालली आहे, असं नोकिया मोबाईल ब्रॉडबँड इंडेक्स 2022 अहवालात नमूद करण्यात आलं आहे.येत्या काही महिन्यात 4 जी वापरणारे 5 जी कडे स्विच होतील. तर 2 जी युजर्स 5 जी किंवा 4 जी वापरताना दिसतील. अहवालानुसार, 2024 पर्यंत 5 जी वापरणाऱ्यांची संख्या जवळपास 150 मिलियन इतकी असेल. तर 4 जी आणि 5 जी वापरणाऱ्यांची संख्या एकत्रितपणे 990 मिलियन इतकी होईल.
अहवालानुसार, प्रत्येक व्यक्ती महिनाकाठी 19.5 जीबी डेटा वापरत असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. 2018 मध्ये प्रत्येक व्यक्ती 9.7 जीबी डेटा वापरत होती. चक्रवाढ वार्षिक वाढ दराने पाहिल्यास 19 टक्क्याने वाढत आहे. मोबाईल डेटा ट्राफिकचा विचार केल्यास पाच वर्षात ही संख्या 3.2 पटीने वाढली आहे.2018 मध्ये मोबाईल डेटा युसेज दर महिना 4.5 एक्साबाईट होता. 2022 मध्ये हाच आकडा 14.4 एक्साबाईट्स इतका आहे.
4जी आणि 5जी मोबाईल ग्राहक मिळून आता देशातील एकूण मोबाईल डेटा ट्राफिकमध्ये जवळपास 100 टक्के वाटा आहे, असे अहवालात म्हटले आहे.असं असलं तरी 4 जी चा वाटा 99 टक्के आहे असं अहवालातून स्पष्ट झालं आहे.
दुसरीकडे भारतात 5 जी सेवा डिसेंबर 2022 पासून सुरु झाली आहे.रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलनं भारतात 5 जी सेवा ऑक्टोबरपासून देण्यास सुरुवात केली आहे. रिलायन्स 230, तर भारती एअरटेलनं 100 शहरं आपल्या नेटवर्क अंतर्गत आणली असल्याचा दावा केला आहे. तसेच येत्या 15 महिन्यात संपूर्ण देशभर सेवा सुरु करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे.
5 जी सेवा जोमाने सुरु झआल्यास 2024 पर्यंत डेटा युसेज प्रति व्यक्ती 43.7 एक्साबाईट इतका असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. असं असताना 2022 या वर्षात 730 मिलियन सक्रिय 4जी डिव्हाईस होती. त्यापैकी 85 मिलियन डिव्हाईस 5 जीला सपोर्ट करणारी आहेत, असंही अहवालात म्हंटलं आहे.
इंटरनेट युजर्समध्ये भारत दुसऱ्या स्थानावर
जागतिक स्तराचा विचार केल्यास चीनमध्ये 102 कोटी इंटरनेट युजर्स आहेत. तर भारतात हाच आकडा 65.2 कोटी इतका आहे.अमेरिकेत 30.7 कोटी, इंडोनेशियात 20.4 कोटी आणि ब्राझीलमध्ये 16.5 कोटी इतका आहे. जगात एकूण 503 कोटी इंटरनेट युजर्स आहेत. त्यापैकी 470 कोटी युजर्स सोशल मीडियावर आहेत. इंटरनेट डेटा किमतीच्या बाबतीत भारत पाचव्या स्थानावर आहे. भारतात एका जीबीसाठी सरासरी 13.92 रुपये मोजावे लागतात.