iPhone 17 Pro मध्ये मिळणार हे नवे फीचर्स; जाणून घ्या काय असणार खास?
iPhone 17 Pro हा iPhone 16 Pro च्या तुलनेत डिझाइन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत एक पाऊल पुढे असेल, असं दिसतंय. हे बदल फोनचा वापर अधिक चांगला आणि आकर्षक बनवू शकतात.

Apple कंपनी यंदा सप्टेंबरमध्ये आपली नवी iPhone 17 सीरीज बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यात “iPhone 17 Pro” मॉडेलचा देखील समावेश असणार आहे. Pro मॉडेलमध्ये अनेक महत्त्वाचे आणि आकर्षक फिचर्स असल्याची माहिती समोर आली आहे. कॅमेरा डिझाइनपासून ते प्रोसेसर आणि बॅटरीपर्यंत विविध बाबतींत यावेळी महत्त्वाचे बदल करण्यात येणार आहेत.
कॅमेरा डिझाइनमध्ये मोठा बदल
Apple यावेळी iPhone 17 Pro च्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये मोठा बदल करू शकते. आतापर्यंत iPhone मध्ये चौकोनी आकाराचं कॅमेरा सेटअप असायचं. मात्र, नव्या मॉडेलमध्ये आयताकृती किंवा गोळीच्या (pill-shaped) डिझाइनमध्ये कॅमेरा असण्याची शक्यता आहे. तसेच कॅमेराची रचना आडवी (horizontal) होण्याची शक्यता असून, लेन्स मात्र त्रिकोणी मांडणीमध्येच असतील. हा बदल व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या पद्धतीवर परिणाम करू शकतो आणि युजर्सना नव्या अॅंगल्सची सवय लावावी लागू शकते.
२४MP सेल्फी कॅमेरा आणि तिहेरी ४८MP रिअर कॅमेरे
iPhone 17 Pro मध्ये कॅमेरा सेन्सरमध्येही महत्त्वाचे अपडेट मिळणार आहेत. समोरच्या बाजूस यावेळी २४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळण्याची शक्यता आहे, जो iPhone 16 Pro मधील १२MP कॅमेरापेक्षा दुप्पट क्षमतेचा असेल. याशिवाय iPhone 17 Pro Max मध्ये तीनही रिअर कॅमेरे – मेन, अल्ट्रा-वाइड आणि टेलिफोटो – हे ४८ मेगापिक्सलचे असतील, असा अंदाज आहे. iPhone च्या इतिहासात पहिल्यांदाच तिन्ही रिअर कॅमेरे एवढ्या उच्च क्षमतेचे असणार आहेत.
अधिक वेगवान A19 Pro प्रोसेसर
iPhone 17 Pro मध्ये Apple चा नवा A19 Pro प्रोसेसर वापरण्यात येणार असून तो ३ नॅनोमीटर तंत्रज्ञानावर आधारित असेल. हा प्रोसेसर iPhone 16 Pro मधील A18 Pro पेक्षा अधिक जलद आणि ऊर्जा कार्यक्षम ठरेल, असं सांगितलं जातंय. गेमिंग, मल्टिटास्किंग आणि हाय-परफॉर्मन्स अॅप्सच्या वापरात या प्रोसेसरमुळे स्पष्ट फरक जाणवेल आणि युजर्सना एक अधिक स्मूथ आणि वेगवान अनुभव मिळेल.
डिझाइनमध्ये नवा प्रयोग – अॅल्युमिनियम फ्रेम
Apple यावेळी iPhone 17 Pro मध्ये टायटॅनियमऐवजी अॅल्युमिनियम फ्रेम देणार आहे. iPhone 15 Pro आणि 16 Pro मध्ये टायटॅनियमचा वापर करण्यात आला होता, पण Pro मॉडेलमध्ये अॅल्युमिनियमचा हा पहिलाच प्रयोग असेल. डिझाइनच्या दृष्टीने, फोनचा वरचा भाग अॅल्युमिनियमचा आणि खालचा भाग काचेचा असण्याची शक्यता आहे. यामुळे वायरलेस चार्जिंग सुरूच राहील, आणि फोन अधिक हलका व हाताळण्यास सुलभ ठरेल. मात्र टायटॅनियमच्या प्रीमियम लूकची कमतरता काही युजर्सना जाणवू शकते.
बॅटरी अधिक मजबूत आणि देखभाल सुलभ
iPhone 17 Pro मध्ये यावेळी आधीपेक्षा मोठी बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे युजर्सना अधिक बॅकअप मिळेल. शिवाय, iPhone 16 मध्ये वापरलेली removable adhesive पद्धती म्हणजेच बॅटरी बदलण्याची सोपी यंत्रणा, यामध्येही लागू केली जाऊ शकते. मोठी बॅटरी आणि सुलभ देखभाल यामुळे हा फोन दीर्घकाळ वापरणाऱ्यांसाठी एक योग्य आणि टिकाऊ पर्याय ठरू शकतो.