व्हॉट्सअॅप युजर्स सावधान! डेटा चोरीचा मोठा धोका, ‘या टिप्स’ फॉलो करा आणि सुरक्षित राहा!
व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी मोठा सायबर धोका समोर आला आहे! डेस्कटॉप व्हर्जनमध्ये धोकादायक त्रुटी सापडल्यामुळे हॅकर्स सहज तुमचा वैयक्तिक डेटा हॅक करू शकतात.तर तुमचं डिजिटल आयुष्य सुरक्षित राहावं म्हणून हा लेख सविस्तर एकदा नक्की वाचा!

व्हॉट्सअॅप वापरणाऱ्या लाखो भारतीयांसाठी सरकारकडून एक महत्त्वाचा सायबर इशारा जारी करण्यात आला आहे. व्हॉट्सअॅपच्या डेस्कटॉप व्हर्जनमध्ये गंभीर सुरक्षासंंधी आढळल्या असून, याचा फायदा घेऊन हॅकर्स तुमचा खासगी डेटा चोरू शकतात आणि तुमच्या संगणकावर हानिकारक सॉफ्टवेअरही इन्स्टॉल करू शकतात.
भारत सरकारच्या सायबर सुरक्षा यंत्रणेने (CERT-In) स्पष्ट केलं आहे की, व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅपच्या जुन्या आवृत्त्यांमध्ये (2.2450.6 पेक्षा जुन्या) एक मोठी त्रुटी आढळली आहे. या त्रुटीचा फायदा हॅकर्सना मिळू शकतो आणि ते तुमच्या संगणकावर कंट्रोल मिळवू शकतात. या त्रुटीला “CVE-2025-30401” असा तांत्रिक कोड देण्यात आला आहे. हॅकर्स बनावट फाईल्स पाठवून वापरकर्त्यांना फसवू शकतात. एकदा ही फाईल उघडल्यास तुमच्या संगणकात हानिकारक कोड इन्स्टॉल होतो आणि तुमच्या खासगी डेटाचा हॅकर्सना ताबा मिळतो.
कोण धोक्यात आहे?
हा धोका प्रामुख्याने Windows ऑपरेटिंग सिस्टमवर व्हॉट्सअॅप डेस्कटॉप अॅप वापरणाऱ्यांसाठी आहे. तुम्ही जर अद्याप व्हॉट्सअॅपचं अॅप अपडेट केलं नसेल, तर तुमचाही डाटा चोरी होऊ शकतो.




यापासून कसं वाचाल?
- तातडीने व्हॉट्सअॅप अपडेट करा : व्हॉट्सअॅपची नवीन आणि सुरक्षित आवृत्ती (2.2450.6 किंवा त्याहून पुढील) मायक्रोसॉफ्ट स्टोअर किंवा अधिकृत वेबसाइटवरून लगेच डाऊनलोड करा.
- अनोळखी फायलींना ‘ना’ म्हणा : कोणतीही अज्ञात किंवा संशयास्पद फाईल उघडण्यापूर्वी सावधगिरी बाळगा, अगदी ती ओळखीच्या व्यक्तीकडून आली असली तरी.
- अँटीव्हायरस अपडेट ठेवा : सतत अँटीव्हायरस सॉफ्टवेअर अपडेट ठेवा आणि नियमितपणे संगणक स्कॅन करा.
- ऑटो अपडेट्स सुरू ठेवा : व्हॉट्सअॅप आणि Windows दोन्हींचे अपडेट्स ऑटो चालू ठेवा, जेणेकरून भविष्यातील धोके टाळता येतील.
अधिक माहितीसाठी तुम्ही व्हॉट्सअॅपच्या अधिकृत सुरक्षा सल्ला पेजला भेट देऊ शकता:
https://www.whatsapp.com/security/advisories/2025