परफेक्ट फ्रिज हवाय? मग साईज ठरवताना ‘ही’ चूक टाळा !
नवीन फ्रिज घेताना 'लीटर' हा शब्द ऐकून तुम्हीही विचारात पडला असाल की पाण्याच्या मापाचा फ्रिजच्या जागेची काय संबंध ? पण या साध्या वाटणाऱ्या आकड्यामागे दडलंय तुमच्या कुटुंबाच्या गरजेचं, किचनमधल्या जागेचं आणि महिन्याच्या वीजबिलाचं गणित! चला, जाणून घेऊया फ्रिजचे 'लीटर' म्हणजे काय आणि तुम्ही तुमच्यासाठी अचूक फ्रिज कसा निवडाल.

उन्हाळ्याच्या कडाक्यात किंवा रोजच्या घरगुती गरजेसाठी फ्रिज हे आजच्या काळात एक अनिवार्य उपकरण बनलंय. पण जेव्हा नवीन फ्रिज खरेदी करायचा विचार करतो, तेव्हा सेल्समन अगदी पहिल्यांदा सांगतो “हे बघा, हा फ्रिज २५० लीटरचा आहे, हा २०० लीटरचा आहे…” मग आता हे ‘लीटर’ ऐकून अनेकांना पहिल्यांदा वाटतं, हे पाण्याचं मोजमाप! पण फ्रीजच्या बाबतीत हे गणित थोडं वेगळं आहे.
‘लीटर’ म्हणजे नेमकं काय?
फ्रिजमध्ये ‘लीटर’ या शब्दाचा अर्थ पाणी साठवण्याशी नाही, तर त्याच्या आतल्या ‘स्टोरेज स्पेस’ म्हणजे वस्तू ठेवण्यासाठी असलेल्या एकूण जागेशी आहे. जेवढा लीटर जास्त, तेवढा फ्रिज मोठा!
तुमच्यासाठी किती ‘लीटर’ चा फ्रिज योग्य?
एकटे राहणारे किंवा जोडप्यांसाठी: 150 ते 250 लीटरचा फ्रिज पुरेसा.
लहान कुटुंब (३-४ माणसं) : 250 ते 350 लीटर फ्रिज योग्य.
मोठं कुटुंब (५+ माणसं) किंवा साठवणूक जास्त : 400 लीटर किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेचा फ्रिज.
चुकीच्या साईजचा फ्रिज घेतल्यास काय त्रास होतो?
जर फ्रिज गरजेपेक्षा लहान घेतला, तर त्यात सामान ठेवण्यासाठी पुरेशी जागा राहत नाही. त्यामुळे फळं, भाज्या, दूधसारखी वस्तू गच्च भरली जातात, ज्यामुळे थंड होण्याचा वेग कमी होतो. याचा परिणाम म्हणजे अन्न पटकन खराब होण्याची शक्यता वाढते आणि फ्रिजच्या कार्यक्षमतेवरही परिणाम होतो.
दुसरीकडे, जर गरजेनुसार खूप मोठा फ्रिज घेतला, तर तो उगाचच घरात जागा अडवतो. त्यात असलेली रिकामी स्पेसही थंड ठेवण्यासाठी मशीनला जास्त मेहनत घ्यावी लागते, ज्यामुळे वीजेचा खर्च वाढतो. शिवाय, मोठ्या साईजच्या फ्रिजसाठी तुमच्याकडून अधिक पैसेही खर्च होतात जे पूर्णतः अनावश्यक असतात. म्हणूनच, घरातल्या लोकसंख्येनुसार योग्य क्षमतेचा फ्रिज निवडणं खूप महत्त्वाचं आहे.
फ्रिजचा साईज तुमच्या वापरावर ठरते. गरजेपेक्षा मोठा फ्रिज घेतल्यास बिलावर थेट परिणाम होतो. म्हणूनच आधी कुटुंबाचा अंदाज घ्या, मगच फ्रिजचा ‘लीटर’ ठरवा.