33 वर्षांचा झाला आपला लाडका WWW… ‘असा’ आहे मजेशीर इतिहास…
WWW ला आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा दिवस जगभरात ‘वर्ल्ड वाइड वेब डे’ म्हणून साजरा केला जातो. अद्यापही अनेकांना या मागील इतिहास याच्या निर्मितीची गरज का पडली असा प्रश्न पडला असेल, याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून बघणार आहोत.
सध्याच्या डिजिटल काळात आपण सर्वच जण वर्ल्ड वाईड वेब म्हणजेच डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू (WWW) या शब्दाशी एक प्रकारे बांधले गेले आहोत. या शब्दाविना आपल्या सर्वांचेच जगणं अपूर्ण असल्या सारखं झालं आहे. कुठलीही माहिती हवी असल्यास आपण लगेच याचा वापर करुन मिनिटात आपले काम साध्य करीत असतो. WWW ला आज म्हणजेच 1 ऑगस्ट रोजी 33 वर्षे पूर्ण झाली आहेत. हा दिवस जगभरात ‘वर्ल्ड वाइड वेब डे’ (World Wide Web Da) म्हणून साजरा केला जातो. वर्ल्ड वाइड वेब हे संगणक शास्त्रज्ञ टिम बर्नर्स-ली (Tim Berners Lee) यांनी 1989 मध्ये तयार केले होते. तेव्हापासून या तंत्रज्ञानाने संपूर्ण इंटरनेटचे स्वरूपच बदलून टाकले आहे. तुम्हालाही वर्ल्ड वाइड वेबबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर हा लेख तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल.
वर्ल्ड वाइड वेबचा जन्म कसा झाला?
1989 मध्ये, 35 वर्षीय टिम बर्नर्स ली यांनी युरोपियन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लियर रिसर्च (CERN) मध्ये सहकारी संशोधक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. ली येथे एका संगणक प्रणालीची माहिती दुसऱ्या संगणकावर पाठवत असे. यावेळी त्यांनी विचार केला की सर्व माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होईल, असा मार्ग निर्माण करण्यास काय हरकत आहे…यानंतर ली यांनी याच विषयावर ‘इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट- अ प्रपोजल’ नावाचा शोधनिबंध तयार केला. त्यानंतरच पहिले वेब पेज ब्राउझर म्हणजेच वर्ल्ड वाइड वेबचा जन्म झाला आणि टिम बर्नर्स ली वर्ल्ड वाइड वेबचे जनक बनले.
वर्ल्ड वाइड वेब म्हणजे काय?
वर्ल्ड वाइड वेबला WWW देखील म्हणतात. आपण ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे प्रवेश करतो तो सर्व डेटा म्हणजे इंटरनेटवरील ब्राउझर वर्ल्ड वाइड वेबमध्ये येतो. संगणकीय भाषेत, वर्ल्ड वाइड वेब हे ऑनलाइन डाटा किंवा इंटरनेट डाटाचे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज (HTML) नेटवर्क आहे, ज्यामध्ये हायपरटेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल (HTTP) द्वारे ॲक्सेस केले जाते.
इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेबमध्ये काय फरक?
बरेच लोक इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब यांना सारखेच समजतात, परंतु तसे नाही. वास्तविक, वर्ल्ड वाइड वेब हा ऑनलाइन पेजेसचा एक समूह आहे, तर इंटरनेट हे एक मोठे नेटवर्क आहे, ज्याद्वारे जगभरातील संगणक आणि डिव्हाइसेस जोडली जातात. म्हणजेच, इंटरनेट हे एक मोठे व्यासपीठ आहे आणि वर्ल्ड वाइड वेब या प्लॅटफॉर्मवर डेटा जमा करुन देण्याचे काम करत असते.