फ्लिपकार्टच्या सीईओचा राजीनामा
मुंबई : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. फ्लिपकार्टची पॅरेंट कंपनी अर्थात वॉलमार्टने गैरव्यवहाराप्रकरणी बिन्नी बन्सल यांची चौकशी सुरु केली होती. त्याचदरम्यान बिन्नी बन्सल यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन शॉपिंग जगतात बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्याने मोठी खळबळ उडाली आहे. “बिन्नी बन्सल यांच्या चौकशीत अद्याप त्यांच्याविरोधात पुरावे […]
मुंबई : फ्लिपकार्टचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) बिन्नी बन्सल यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. फ्लिपकार्टची पॅरेंट कंपनी अर्थात वॉलमार्टने गैरव्यवहाराप्रकरणी बिन्नी बन्सल यांची चौकशी सुरु केली होती. त्याचदरम्यान बिन्नी बन्सल यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला आहे. ऑनलाईन शॉपिंग जगतात बिन्नी बन्सल यांच्या राजीनाम्याने मोठी खळबळ उडाली आहे.
“बिन्नी बन्सल यांच्या चौकशीत अद्याप त्यांच्याविरोधात पुरावे सापडले नाहीत. मात्र, त्यांनी केलेल्या खासगी व्यवहारात दोष आढळले आहेत. व्यवहारात पारदर्शकतेचा अभाव आहे. त्यामुळे बिन्नी बन्सल यांचा राजीनामा स्वीकारला असून, त्यांच्या राजीनाम्याची अंमलबजावणी तातडीने लागू करण्यात आली आहे.” असे वॉलमार्टकडून सांगण्यात आले आहे.
वॉलमार्ट सध्या फ्लिपकार्टच्या उत्तराधिकाऱ्याच्या शोधात आहे. सध्या कल्याण कृष्णमूर्ती हे फ्लिपकार्टच्या सीईओपदी कायम राहतील. अनंत नारायण ‘मिंत्रा’ आणि ‘जबाँग’च्या सीईओपदी कायम असतील. मात्र, ते कृष्णमूर्ती यांना रिपोर्ट करतील. त्याचवेळी, समीर निगम हे ‘फोन पे’च्या सीईओपदी कायम राहतील. कृष्णमूर्ती आणि समीर निगम हे दोघेही बोर्ड कमिटीला रिपोर्ट करतील.
वॉलमार्टने मे महिन्यातच 16 अब्ज डॉलरना फ्लिपकार्टची खरेदी केली होती. वॉलमार्टचा फ्लिपकार्टमध्ये 77 टक्के वाटा आहे. या व्यवहारात फ्लिपकार्टचे सहसंस्थापक सचिन बन्सल यांना आपल्या खात्यातील 5.5 टक्के वाटा विकावा लागला होता. त्यानंतर ते कंपनीतून बाहेर पडले होते. आता बिन्नी बन्सल यांचाही राजीनामा स्वीकारल्याने, दोन्ही बन्सल फ्लिपकार्टमधून बाहेर झाले आहेत.
सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल या दोघांचीही 2005 मध्ये आयआयटी दिल्लीत भेट झाली होती. त्यानंतर त्यांनी एकत्र काम करण्याचं ठरवलं. सुरुवातीला पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्यास सचिन आणि बिन्नी यांनी सुरुवात केली. सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी 2007 मध्ये बंगळुरुत फ्लिपकार्टची स्थापना केली.
फ्लिपकार्ट कंपनी 2011 मध्ये पहिल्यांदा सिंगापूर येथे नोंदणीकृत कंपनी झाली. त्याचवेळी वॉलमार्टने भारतात 2007 साली आपला व्यावसाय सुरु केला होता. त्यांनी मे 2008 मध्ये अमृतसरमध्ये पहिला स्टोअर सुरु केला. आता भारतात वॉलमार्टकडे फ्लिपकार्टसारख्या बड्या कंपन्या आहेत.