EXCLUSIVE : मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध : सूत्र
मुंबई : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या तिन्ही प्रकारात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे. टीव्ही 9 मराठीला यासंदर्भात सूत्रांकडून एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळाली आहे. कुठल्या प्रकाराला किती गुण? मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे की नाही, यासाठी काही बाबींचा अभ्यास केला. यात […]
मुंबई : राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अहवालात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक या तिन्ही प्रकारात मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाले आहे. टीव्ही 9 मराठीला यासंदर्भात सूत्रांकडून एक्स्क्लुझिव्ह माहिती मिळाली आहे.
कुठल्या प्रकाराला किती गुण?
मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या आयोगाने मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे की नाही, यासाठी काही बाबींचा अभ्यास केला. यात मराठा समाजात सामाजिक मागासलेपण किती आहे, यासाठी 10 गुण ठेवण्यात आले होते. आर्थिक मागासलेपणासाठी 7 गुण ठेवून अभ्यास करण्यात आला, तर मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का, हेही तपासले गेले, यासाठी 8 गुण ठेवण्यात आले होते.
यात शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रकारात 8 पैकी 8 गुण मिळाले, मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणात 10 पैकी 7.5 गुण मिळाले, तर आर्थिक मागासलेपणाला 7 पैकी 6 गुण मिळाले आहेत. 25 गुणा पैकी 21.5 गुण मागासवर्गीय आयोगाने दिले आहेत.
45 हजार कुटुंबांचं सर्वेक्षण
एक लाख 93 हजार सुनावणीच्या वेळी अर्ज आले. प्रत्येक जिल्ह्यातील एक तालुका आणि त्यातील पाच गावांमध्ये सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केलं गेलं. 45 हजार कुटुंबांचे सर्वेक्षण झालं. ओबीसीच्या इंडेक्सवर सर्वेक्षण करण्यात आलं. शहरी भागातील सर्वेक्षणही झाले. सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक अशा तीन प्रकारात प्रत्येक कुटुंबाला मागासवर्गीय आयोगाकडून प्रश्न विचारण्यात आले. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचा निष्कर्ष मागास आयोगाने काढल्याची सूत्रांची माहिती असून, राज्य सरकारला अहवाल सादर करण्यात येणार आहे.
मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध झाल्याने मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. मात्र, यासंदर्भात अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
श्रीमंत शाहू छत्रपती नेतृत्त्व करणार
येत्या 26 नोव्हेंबरला मुंबईत विधानभवनावर मराठा क्रांती मोर्चातर्फे गाडी मोर्चा काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चाचं नेतृत्त्व श्रीमंत शाहू छत्रपती करणार आहेत. त्यामुळे या मोर्चाची उत्सुकता वाढली असून, मोर्चांचा प्रभाव सुद्धा आधीपेक्षा वाढण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विधानभवनावर गोडी मोर्चा काढण्याचा निर्णय कोल्हापुरात घेण्यात आला.
मराठा समाज आक्रमक
मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी दिवसागणिक आक्रमक होताना दिसतो आहे. आझाद मैदानातही मराठा समाजातील बांधवांनी उपोषण सुरु केले आहे. विविध ठिकाणी रोज निदर्शनं होत आहे. त्यामुळे आरक्षणासाठी राज्य सरकारवरही दबाव वाढत आहे. त्यात आता श्रीमंत शाहू छत्रपती यांच्याच नेतृत्त्वात गाडी मोर्चा मुंबईत विधानभवनावर धडकणार असल्याने सरकारच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
याआधी गेल्या दोन-अडीच वर्षात मराठा समाजाने 58 मूक मोर्चे काढले, तरीही सरकारला जाग येईन, म्हणून मराठा समाजाने ठोक मोर्चे काढण्यास सुरुवात केली आणि सरकार खडबडून जागं झालं. त्यानंतर मराठा आरक्षणासाठीच्या हालचालींना वेग आला. आमदार, खासदारांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळेच मराठा आरक्षणासाठी काय करता येईल, याच्या चर्चा करु लागले. त्यानंतर मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागवण्यात आला. तो अहवाल 15 नोव्हेंबरपर्यंत सरकारकडे सादर होण्याची शक्यता आहे. आता अटीतटीची वेळ आल्याने येत्या काही दिवसात मराठा आरक्षणाच्या मागणीवर काही ठोस निर्णय झाला नाही, तर समाज आणखी आक्रमक होण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात राज्य सरकार नेमकी काय पावलं उचलतं, हे पाहणं अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.