मराठा आरक्षण: उपोषणकर्ते सचिन पाटील यांची प्रकृती बिघडली
मुंबई: मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते सचिन पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सचिन पाटील यांच्यासह अनेकजण गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याच निर्णय घेतला आहे. […]
मुंबई: मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांसाठी आझाद मैदानात उपोषणाला बसलेले उपोषणकर्ते सचिन पाटील यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सचिन पाटील यांच्यासह अनेकजण गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसले आहेत. या उपोषणकर्त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे न घेण्याच निर्णय घेतला आहे.
‘मराठ्यांनो मुंबईत या’
नाक दाबाल तर तोंड उघडले, त्यासाठी महाराष्ट्रात अन्यत्र नव्हे तर मुंबईतच येऊन आंदोलन करा, कुठेही तोडफोड करु नका, आंदोलन भरकटवण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न आहे, हिंसा नको, अहिंसेने आंदोलन करु, असं आवाहन मराठा उपोषणकर्त्यांनी केलं.
हिंसक आंदोलन आम्हाला करायचे नाही. सरकारला उद्या सकाळपर्यंतच अल्टिमेटम देत आहोत. सरकारने उद्या सकाळपर्यंत निर्णय घेतला नाही, तर पुढे जे होईल त्याला सरकार जबाबदार असेल. मुख्यमंत्र्यांनी आमच्या 3 मागण्यांची पूर्तता करावी. सरकारने आरक्षणाच्या नावाखाली मागण्यांकडे दुर्लश केले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच आरक्षणाची घोषणा करावी, असंही यावेळी उपोषणकर्त्यांनी नमूद केलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा समाजाची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत, असा आरोप आझाद मैदानात उपोषण करणाऱ्या मराठा आंदोलकांनी केला. मराठा समाजाला आरक्षण द्या, आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या, सदानंद मोरे यांचा राजीनामा घ्या, अशा मागण्या यावेळी उपोषणकर्त्यांनी केल्या. आझाद मैदानात गेल्या 14 दिवसांपासून उपोषण सुरु आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली.
फडणवीस सरकार आमचा छळ करत आहे. मेलो तरी मागे हटणार नाही. पुढे जे काही होईल त्याला सरकारने सामोरे जावे. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला दिशाहीन करण्याचं काम केले आहे. आतापर्यंत 42 मराठा आंदोलनकर्ते मेले. नाक दाबाल तर सरकारच तोंड उघडेल, असं यावेळी उपोषणकर्त्यांनी म्हटलं.
‘सदानंद मोरेंचा राजीनामा घ्या’
डॉ.सदानंद मोरे यांना सारथी संस्थेच्या अध्यक्षपदावरुन हटवा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
सारथी संस्था ऑगस्ट 2017 पर्यंत प्रत्येक जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी लिहून दिलं होतं. आज दीड दोन वर्ष झालेत, त्याचं पालन झालं नाही. त्या संस्थेंचे नाममात्र अध्यक्ष सदानंद मोरे यांचा राजीनामा घेऊन, त्या ठिकाणी आयुक्तांची नेमणूक करावी. सारथी संस्थेचं अध्यक्षपद मंत्रिमंडळातील कोणीतरी करावी, अशी आमची ठोस मागणी आहे, असं उपोषणकर्त्यांनी सांगितलं
मुख्यमंत्री आनंद,जल्लोष करण्याची घोषणा करतात हे त्यांना शोभत नाही. मुंबईच्या बाहेर आंदोलन जावे यासाठी मुख्यमंत्र्यांची ही नवी चाल आहे. चंद्रकांत पाटील,विनोद तावडे, रणजीत पाटील हे दिशाभूल करत आहेत, असा आरोप यावेळी करण्यात आला.