महाकुंभ 2025
भारतीय संस्कृती, धर्म आणि परंपरेत महाकुंभचं महत्त्व अन्यनसाधारण आहे. हिंदू धर्मातील सर्वात पवित्र आणि विराट धार्मिक मेळाव्यांपैकी हा एक महत्त्वाचा मेळा आहे. महाकुंभ दर 12 वर्षानंतर येतो. विशेष म्हणजे हरिद्वार, प्रयागराज (अलाहाबाद), उज्जैन आणि महाराष्ट्रातील नाशिक या चारच तीर्थस्थळी याचं आयोजन केलं जातं. आत्म्याची शुद्दी आणि मोक्ष प्राप्तीसाठी महाकुंभ महत्त्वाचा मानला जातो. कुंभमध्ये स्नान केल्यावर सर्व पापातून मुक्ती मिळते, असं मानलं जातं. व्यक्तीच्या पुनर्जन्माचं चक्र पूर्ण होतं असंही सांगितलं जातं. समुद्र मंथनाशी महाकुंभची कथा जोडलेली आहे. जेव्हा देव आणि असुरांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्र मंथन केलं, तेव्हा अमृत कलशातील अमृताचे काही थेंब चार ठिकाणी पडले. हरिद्वार, प्रयागराज, उज्जैन आणि नाशिक या चार ठिकाणी अमृताचे थेंब पडले. त्यामुळेच या स्थळांना पवित्र मानलं जातं. त्याचमुळे या ठिकाणी दर 12 वर्षांनी महाकुंभचं आयोजन केलं जातं. महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नाही. किंवा धार्मिक मेळा नाही तर, महाकुंभामुळे विविध संस्कृती, भाषा आणि समाजातील लोक एकजूट होतात. हा एकतेचा महामेळा आहे. महाकुंभमध्ये देशभरातील साधू, संत, महात्मा आणि संन्याशी भाग घेतात. एरव्ही न दिसणारे नागा साधूही कुंभ मेळ्यात पाहायला मिळतात. या ठिकाणी आखाड्यांचं विशेष महत्त्व असतं. या ठिकाणी लोक संतांचे आशीर्वाद घेतात आणि त्यांच्या प्रवचनाचा लाभ घेतात. केवळ भारतासाठीच नव्हे तर जगासाठी महाकुंभ आकर्षणाचं केंद्र झाला आहे. विदेशातूनही लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. भारतीय संस्कृती आणि धर्माचं महत्त्व समजून घेत असतात.