सैफ अली खान
सैफ अली खान हा हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याचे वडील मंसूर अली खान पटौदी हे क्रिकेटपटू होते आणि त्यांची आई शर्मिला टागोर ही अभिनेत्री आहे. गेल्या ३० वर्षांपासून तो हिंदी चित्रपट क्षेत्रात सक्रीय आहे. त्याने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरवण्यातही आले आहे. सैफने ‘मैं खिलाड़ी तू अनाड़ी’, ‘रेस’, ‘एक हसीना थी’, ‘ओमकारा’, ‘कॉकटेल’, ‘कल हो न हो’ आणि ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले. ‘हम तुम’ या चित्रपटासाठी त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला होता. नेटफ्लिक्सच्या ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमधून त्याने ओटीटी कलाविश्वात पदार्पण केले होते. सैफ अली खानने दोन लग्न केली आहेत आणि त्यांना चार मुले आहेत. सैफ अली खानला पहिली पत्नी अमृता सिंह यांच्यापासून एक मुलगी सारा अली खान आणि मुलगा इब्राहिम अली खा हा आहे. सारा ही अभिनेत्री असून मुलगा इब्राहिम अलीही लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करू शकतो, अशी चर्चा रंगली आहे. अमृता सिंहसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सैफ अली खानने बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूरशी २०१२ मध्ये दुसरे लग्न केले. करीनापासून त्यांना तैमूर आणि जेह अशी दोन मुलं आहेत.