स्वर्गात आल्याचा अनुभव, मुंबई-पुण्यापासून अगदी जवळ आहे हे हिल स्टेशन
मुंबई किंवा पुण्यातील लोकांसाठी जवळच एक सुंदर असे हिल स्टेशन आहे. येथे आल्यावर अनेकांना स्वर्गात आल्याचा अनुभव येतो. उन्हाळ्याच्या झळांपासून जर तुम्हाला दिलासा हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की भेट देऊ शकता. कुठे आहे हे ठिकाण जाणून घ्या.
महाराष्ट्रात अनेक थंड हवेची ठिकाणं आहेत. ज्यामध्ये खंडाळा, पाचगणी, महाबळेश्वर या ठिकाणांचा समावेश आहे. पण मुंबईच्या जवळ देखील एक ठिकाण आहे. महाराष्ट्रातील हे हिल स्टेशन संपूर्ण भारतातील सर्वात लहान हिल स्टेशन मानले जाते. येथे नेहमीच पर्यटकांची मोठी गर्दी असते. येथे आल्यावर स्वर्गात आल्यासारखे वाटते. मुंबई-पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकं माथेरानला नेहमी फिरायला येत असतात.
महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील माथेरान हिल स्टेशन अनेकांना माहित आहे. माथेरानला येण्यासाठी तुम्हाला नेरळ स्टेशनवरुन टॉय ट्रेनने यावे लागते. टॅक्सी देखील येथे उपलब्ध आहे. पण टॉय ट्रेनने प्रवास करताना अनेक सुंदर ठिकाणांना भेट देता येते. टॉय ट्रेनमधून प्रवास करतानाचा अनुभव देखील छान असतो.
प्रदूषण मुक्त हिल स्टेशन
माथेरान हे महाराष्ट्रातील पश्चिम घाटाच्या सह्याद्रीच्या डोंगररांगेत वसलेले एक छोटेसे हिल स्टेशन आहे. जे प्रदूषणमुक्त हिल स्टेशन आहे. माथेरानमधील दस्तुरी पॉइंटच्या पलीकडे कोणत्याही वाहनाला परवानगी नाही. येथून पर्यटकाला सुमारे अडीच किमी अंतर पायी किंवा मग पालखी किंवा पोनीने जावे लागते. या वाटेत तुम्हाला सुंदर निसर्गाचं दर्शन होतं.
माथेरानला जाण्यासाठी नेरळ जंक्शनपासून धावणारी टॉय ट्रेन हा सर्वोत्तम पर्याय आहे. ही टॉय ट्रेन सुमारे 20 किमीचे अंतर मोठ्या निसर्गरम्य भागातून जात पर्यटकांना माथेरानच्या बाजारपेठेच्या मध्यभागी असलेल्या रेल्वे स्थानकापर्यंत घेऊन जाते. ही ट्रेन अत्यंत वळणदार रस्त्यांवरून जाते. पर्यटकांनाही प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचा सल्ला दिला जातो
निसर्गाच्या जवळ जाण्याचा अनुभव
माथेरानला भेट देताना तुम्हाला निसर्गाच्या अगदी जवळ असल्याचा अनुभव येतो. येथे ढगांनी वेढलेले पर्वत आणि कोसळणारे धबधबे, सुंदर तलाव, उद्याने आणि अनेक वेगवेगळे पॉइंट्स पाहायला मिळतात. येथील हवामानही खूप छान असते.
माथेरानला कसे जायचे
तुम्हाला जर माथेरानला भेट देण्याची इच्छा असेल तर तुम्ही नेरळ जंक्शनवरुन जाऊ शकता. नेरळ जंक्शनवरून टॉय ट्रेनने माथेरानला जाता येते. टॅक्सी आणि बस सेवा देखील येथे उपलब्ध आहे.