चोरीनंतर त्यांनी भिंतीवर ‘आय लव्ह यू, 108’ लिहिलं, पोलिसांवरचं त्यांचं प्रेम व्यक्त केलं…
एकूण चोरी दोन लाख रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे.
चोरीच्या अनेक विचित्र घटना घडतात. अनेकदा चोरटे त्यांच्या कृत्यामुळे चर्चेचा विषय ठरतात, कधी कधी असं काही करतात की, लोक आणि पोलिस दोघंही गोंधळून जातात. चोरांनी चोरी केली आणि भिंतीवर असं काही लिहिलं की ते वाचून पोलिसांनाही आश्चर्याचा धक्का बसला, अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगडमधील अंबिकापूरची आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इथे बसस्थानकाजवळ असलेल्या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात चोरी झाली. चोरट्याने ॲस्बेस्टॉसचा पत्रा तोडून दुकानात प्रवेश केला. एकूण चोरी दोन लाख रुपयांची असल्याचे सांगितले जात आहे.
ही घटना केल्यानंतर चोराने दुकानात ‘आय लव्ह यू, 108’ असं लिहिलंय. हे पाहून लोक आश्चर्यचकित झालेत. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. माहिती मिळाल्यानंतर पोलीसही घटनास्थळी पोहोचले.
दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरट्यांचा हा प्रकार कैद झालाय. हे प्रकरण प्रतिक्षा बसस्थानकाजवळील अमर इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाशी संबंधित आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
या दुकानाचे मालक रतन यादव गुरुवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी पोहोचले तेव्हा दुकानाच्या वरील ॲस्बेस्टॉसचा पत्रा तुटलेला होता. आतमध्ये माल विखुरला होता. याशिवाय चोरांनी ‘आय लव्ह यू, 108’ लिहिलेलंही त्यांना आढळलं.
पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक मास्क लावलेला चोर दिसलाय. या प्रकरणी तपास सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.
भिंतीवर चोराने काय लिहिले आहे, याचा अर्थही कोणाला कळत नाही. ‘आय लव्ह यू, 108’ हे बहुदा पोलिसांसाठी लिहिलेले आहेत,असा चिमटाही लोक काढतायत.