रुसलेला नवरदेव मंडप सोडूनच पळाला, पोलिसांची एंट्री झाली अन्..
एका तरूणीचं लग्न मोडता-मोडता वाचलं , तेही पोलिसांमुळे. खरंतर त्या लग्नात अचानक ट्विस्ट आला. कारण भर लग्नमंडपातूनच नवरा मुलगा आणि वऱ्हाडी निघून गेले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. वधूकडच्या लोकांनी योग्य रितीने स्वागत केलं नाही, बस एवढ्याशा कारणामुळे नवरा आणि कुटुंबीय तिथून निघून गेले.
प्रयागराज | 3 फेब्रुवारी 2024 : उत्तर प्रदेशातील फतेहपूरमधील राधानगर गावात एका लग्नात एक विचित्र घटना समोर आली आहे. या लग्नात पोलिसांनी मॅचमेकरची भूमिका बजावली होती. 1 फेब्रुवारी रोजी एका 22 वर्षीय तरूणीचं लग्न मोडता-मोडता वाचलं , तेही पोलिसांमुळे. खरंतर त्या लग्नात अचानक ट्विस्ट आला. कारण भर लग्नमंडपातूनच नवरा मुलगा आणि वऱ्हाडी निघून गेले आणि एकच गोंधळ निर्माण झाला. वधूकडच्या लोकांनी योग्य रितीने स्वागत केलं नाही, बस एवढ्याशा कारणामुळे नवरा आणि कुटुंबीय तिथून निघून गेले. ते तिथून जाताना दिसताच इतर वऱ्हाड्यांनीही मंडपातून पाय काढून घेतला.
वधूच्या कुटुंबियांनी घेतली पोलिसांकडे धाव
हे पाहून वधूच्या घरचे तर हतबुद्धच झाले आणि संतापलेही. असं लग्न मोडल्यामुळे वधूकडच्या लोकांनी हार मानली नाही , त्यांनी थेट पोलिस स्टेशन गाठत तेथील अधिकाऱ्यांना सर्व घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर जोनिहा पोलीस चौकीचे प्रभारी आलोक कुमार तिवारी यांनी या प्रकरणाची दखल घेण्याचे आश्वासन दिले.
पोलिसांची झाली एंट्री आणि..
या संपूर्ण प्रकरणाची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, लग्न मोडल्याची माहिती मिळताच स्टेशन प्रभारी आणि आणखी तीन पोलिस वराच्या गावी ढकोली येथे पोहोचले. तेथे पोहोचल्यावर त्यांनी वर आणि त्याच्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांन समजावलं आणि लग्नासाठी तयार केलं. अखेर सगळे लग्नासाठी राजी झाले. रणजीत कुमार असे त्या वराचे नाव आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर वर आणि त्याच्या घरचे पुन्हा लग्नस्थळी पोहोचले आणि पोलिसांच्या उपस्थितीत विवाह पार पडला. यानंतर वधूचे वडील राजबहादूर यांनी पोलिसांचे आभार मानले. विशेष म्हणजे सर्व विधी होईपर्यंत पोलीस लग्नस्थळी तिथेच उपस्थित होते.