बंदी असतानाही अटल सेतुवर पोहोचली ऑटोरिक्षा? नेटकरी म्हणाले “आता फक्त वडापावचा स्टॉल..”
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक म्हणजेच 'अटल सेतु' हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र अवघ्या काही दिवसांतच नागरिक इथल्या वाहतुकीचे नियम मोडताना दिसत आहेत. या सेतुवर चक्क ऑटोरिक्षा पहायला मिळाली. त्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई : 17 जानेवारी 2024 | ‘अटल सेतू’ म्हणून ओळखला जाणारा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. काही दिवसांपूर्वीच या अटल सेतूचं उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं. त्यानंतर हा सेतू वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आता अवघ्या काही दिवसांतच हा सेतू नियम मोडण्याच्या घटनेमुळे चर्चेत आला आहे. या अटल सेतुवर एक ऑटोरिक्षा दिसली. ऑटोरिक्षांना पुलावर बंदी असताना ती त्याठिकाणी कशी पोहोचली, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. एका एक्स (ट्विटर) युजरने हा फोटो शेअर केला आहे. सोशल मीडियावर हा फोटो वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होत आहे. अटल सेतूवरील टोल बुथ पार करून ही ऑटोरिक्षा तिथे पोहोचलीच कशी, असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे.
मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर मोटारसायकल, मोपेड, तीनचाकी टेम्पो, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टर आणि संथ गतीने चालणाऱ्या वाहनांना परवानगी दिली जाणार नसल्याचं मुंबई वाहतूक पोलिसांनी 11 जानेवारी रोजी जाहीर केलं होतं. सेतुवरील सुरक्षा आणि सुरळीत वाहतुकीसाठी हा नियम आहे. त्यामुळे ऑटोरिक्षा सेतुवर कशी आली, याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी उत्सुक आहेत.
पहा फोटो
Atal setu pic.twitter.com/YOVp08VmLm
— Saravanan Radhakrishnan ☮️ (@saravnan_rd) January 15, 2024
अटल सेतुच्या उद्धाटनानंतर अनेकजण त्यावर सेल्फी घेण्यासाठी आणि पिकनिकसाठी गर्दी करताना दिसले. या पुलावर गाडी थांबवून काही जण फोटो क्लिक करू लागले. अटल सेतुवर पिकनिकसाठी आलेल्या गाड्यांची रांगही एका व्हिडीओत पहायला मिळाली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी कडक इशारा दिला. अटल सेतू हा पिकनिकचं ठिकाण नाही असं सांगत फोटोसाठी वाहनं थांबवणाऱ्यांवर एफआयआर दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
21.8 किलोमीटरचा हा सागरी सेतू मुंबईतील शिवडी ते रायगड जिल्ह्यातील न्हावा शेवाशी जोडतो. 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं उद्धाटन पार पडलं होतं. या सागरी सेतुमुळे मुंबई आणि नवी मुंबईदरम्यानचा प्रवासाचा वेळ फारच कमी झाला आहे.
या सागरी सेतूवर ताशी 100 किमी वेगाने वाहने धावतात. यामुळे मुंबई ते नवी मुंबी हा दोन तासांचा प्रवास अवघ्या 20 मिनिटांत होणार आहे. शुक्रवारी लोकार्पण झाल्यानंतर हा अटल सेतू सर्वसामान्यांसाठी खुला झाला. अटल सेतूवर अत्याधुनिक वाहतूक नियंत्रण यंत्रणा अर्थात इंटिलिजेंट ट्राफिक मॅनेजमेन्ट सिस्टीम कार्यान्वित केली आहे. या यंत्रणेच्या अंतर्गत या सागरी सेतूवर विविध प्रकारचे सुमारे 400 कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्यामुळे वेगमर्यादेचे उल्लंघन करणारी वाहने या कॅमेऱ्यात काही सेकंदात कैद होणार आहेत. असं असतानाही ऑटोरिक्षा या पुलावर कशी पोहोचली, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.