बॉस सुट्टी देत नाही म्हणजे काय?, तरीही त्यांनी लग्न केलंच; कसं?
व्हिडिओ कॉलवर विवाहाची प्रथा आधुनिक तंत्रज्ञानामुळे शक्य झाली आहे आणि त्याच्या मदतीने अडचणींवर मात करून दोन प्रेमींचे लग्न साकार झाले. तंत्रज्ञानाचा योग्य वापर जरी अडचणींमध्ये केला तरी ती एक सकारात्मक दिशा ठरू शकते, हेच यातून स्पष्ट झालं आहे.
एकदा लग्न करायचं ठरवलं तर मग जोडप्यांना कुणाचा बापही रोखू शकत नाही. मग तो बॉस का असे ना. बॉसने लग्नाची सुट्टी नाकारली म्हणून एका जोडप्याने चक्क व्हर्च्युअल विवाह केला. या लग्नाची गोष्टच न्यारी आहे. हिमाचल प्रदेशात हा अनोका व्हर्च्युअल निकाह समारंभ पार पडला. विशेष म्हणजे वधू आणि वराने वेगवेगळ्या देशांमध्ये राहून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून विवाह केला. बिलासपूरच्या अदानान मुहम्मदने तुर्कीमधून आणि त्याच्या बायकोने हिमाचल प्रदेशातील मंड़ीमधून विवाह केला.
अदानान मुहम्मद तुर्कीमध्ये काम करतो आणि त्याला लग्नासाठी भारतात येण्यासाठी रजा मिळाली नाही. बॉसने त्याला लग्नाची रजा नाकारल्यामुळे त्याला व्हिडिओ कॉलद्वारे लग्न करावे लागले. मुलीचे आजोबा मरणाला टेकले आहेत. त्यांना आपल्या नातीच्या लग्नाला उपस्थित राहायचं होतं. आपल्या डोळ्यादेखत नातीचं लग्न पाहायचं होतं. त्यामुळे दोन्ही कुटुंबांनी व्हिडिओ कॉलद्वारे विवाह करण्याचा निर्णय घेतला.
व्हिडिओ कॉलवरच विधी
विवाहाचे समारंभ पारंपारिक पद्धतीने व्हिडिओ कॉलवर पार पडले. वर- कन्येच्या कुटुंबीयांनी व्हर्च्युअल निकाहसाठी मान्यता दिली आणि त्या दिवशी बिलासपूरच्या कुटुंबाने मंडी येथे वधूच्या कुटुंबाच्या घरी विवाह समारंभासाठी मिरवणूक सुरू केली. सोमवारी व्हिडिओ कॉलवर काझीच्या मार्गदर्शनात ‘कुबूल है’ म्हणत विवाहाची विधी पूर्ण करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हा विवाह साकार झाल्याबद्दल मुलीच्या काकांनी समाधान व्यक्त केलं.
कठिण परिस्थितीत निर्णय
अदानान मुहम्मदला ऑफिसधून रजा न मिळाल्यामुळे त्याला तुर्कीमध्येच राहून व्हिडिओ कॉलद्वारे विवाह करणे भाग पडलं. त्याचे कुटुंब आणि नवरीच्या कुटुंबाने व्हिडिओ कॉलवर विवाह करण्याचा निर्णय घेतला, जो की अत्यंत अवघड परिस्थितीमध्ये घेतला गेला.
यापूर्वीही अशा विवाहाची उदाहरणे
अशा प्रकारचे व्हर्च्युअल विवाह यापूर्वी देखील झाले आहेत. जुलै 2023 मध्ये हिमाचल प्रदेशातील एका जोडप्याने ऑनलाइन विवाह केला होता. त्यावेळी शिमलाच्या कांग्रा जिल्ह्यातील कुटुंबीयांनी खराब हवामानामुळे विवाहाच्या विधी व्हिडिओ कॉलद्वारे पूर्ण केल्या होत्या. कोविड-19 च्या काळात देखील अनेक लोकांनी व्हिडिओ कॉलवर विवाह केला होता.