खेमचंद कुमावत, Tv9 मराठी, जळगाव : अहिराणी गाण्यांची (Ahirani Songs) क्रेझ ही दिवसेंदिवस प्रचंड वाढताना दिसत आहे. अगदी लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत या गाण्यांची क्रेझ आहे. खान्देशातील ‘हाई झुमका वाली पोर’ या प्रसिद्ध अहिराणी गाण्याचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आलेला. धरणगाव तालुक्यातील एका शाळेच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात संपूर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांनी या गाण्यावर ठेका धरलेला. विशेष म्हणजे या गाण्याची क्रेझ इतकी वाढली आहे की महाराष्ट्र आणि जगभरात प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या भर कीर्तनाच्या कार्यक्रमात एका चिमुकल्याने ‘झुमका वाली पोर’ गाण्यावर ठेका धरला.
या चिमुकल्याने इंदुरीकर महाराजांच्या समोर ‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं गात ठेका धरला. हा चिमुकला कीर्तनात अगदी पहिल्याच रांगेत बसला होता. त्यामुळे इंदुरीकर महाराजांना त्याचं नृत्य करणं आणि गाणं म्हणणं सहज निदर्शनास आलं. इंदुरीकर महाराजांनी या चिमुकल्याला पाहिल्यानंतर त्यांनी त्या मुलाला स्टेजवर बोलावलं. त्यानंतर त्याला स्टेजवर गाणं म्हणून नाचायला सांगितलं. विशेष म्हणजे हा चिमुकला भर मंचावर बेधडकपणे इंदुकरीकर महाराजांच्या बाजूला उभा राहीला. त्याने माईक खाली करायला लावला आणि गाणं म्हणत ठेका धरला. यावेळी इंदुरीकर महाराजांनी स्वत:च्या डोक्यावर हात ठेवला आणि कीर्तनाला उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
चक्क सुप्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्यासमोर चिमुकल्याने धरला खान्देशी गाण्यावर ठेका #ahirani #jhumkawalipor #ahiranisong pic.twitter.com/JvX2XzEgIy
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) February 28, 2023
हा सगळा प्रकार घडत असताना श्रोत्यांमधील एका व्यक्तीने संपूर्ण घटना आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केलीय. चिमुकल्याचा इंदुरीकर महाराजांच्या बाजूला उभं राहून गाणं म्हणत नृत्य करण्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जण चिमुकल्याच्या बेधडकपणाचं कौतुक करत आहेत. संबंधित घटना ही मजेशीर अशीच आहे. विशेष म्हणजे इंदुरीकर महाराजांनीदेखील यातून सर्वांना आनंदच देण्याचा प्रयत्न केल्याचं या व्हिडीओतून दिसून येतंय.
अहिराणी गाण्यांमध्ये सध्या लोकप्रिय आणि प्रसिद्ध झालेल्या गाण्यांमध्ये ‘हाई झुमका वाली पोर’ या गाण्याने खूप भाव खाललाय. खान्देशात वाढदिवसाचा कार्यक्रम असो, लग्न असो किंवा हळदीचा कार्यक्रम असो, कोणताही कार्यक्रम असो, हे गाणं नाही वाजलं तर त्या कार्यक्रमात मजाच नाही. विशेष म्हणजे फक्त अहिराणीच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशात या गाण्याचे चाहते आहेत. त्यामुळे अवघ्या महिन्याभरात लाखो प्रेक्षकांनी यूट्यूबवर हे गाणं पाहिलं आहे.
‘हाई झुमका वाली पोर’ हे गाणं विनोद कुमावत आणि गायक भैय्या मोरे या दोन तरुणांनी लिहिलंय. तसेच त्यांनीच हे गाणं तयार केलंय. या गाण्यात डान्स करणारा तरुण विनोद कुमावत आहे आणि हे गाणं भैय्या मोरे या तरुणाने गायलंय. भैय्या मोरेला हे गाणं गाण्यासाठी अंजना बर्लेकर या महिला गायिकेने साथ दिलीय. तर राणी कुमावत ही अभिनेत्री या गाण्यात विनोद कुमावत सोबत नृत्य करताना दिसत आहे.
या गाण्याने यूट्यूबवर प्रदर्शित झाल्यापासून आतापर्यंतच्या अवघ्या तीन महिन्यात तब्बल 92 मिलियन व्ह्यूज मिळवले आहेत. 1 मिलियन म्हणजे 10 लाख व्ह्यू होतात, याचाच अर्थ 92मिलियन म्हणजे तब्बल 9 कोटी 20 लाख प्रेक्षकांनी अवघ्या तीन महिन्यात हे गाणं पाहिलं आणि ऐकलं आहे.