‘चाय सुट्टा बार’चा संस्थापक ऑफिस मिटींगमध्ये म्हणाला ‘ही’ गोष्ट; ट्रोलिंगनंतर द्यावं लागलं स्पष्टीकरण
'चाय सुट्टा बार' हे त्यांच्या कुल्हडमधील चहासाठी फार प्रसिद्ध आहेत. दररोज त्यांच्याकडून लाखो मातीच्या कपांचा वापर केला जातो. त्यामुळे कुंभारांसाठी रोजगार निर्माण झाला आहे. अनुभव दुबे हा या फ्रँचाइजीचा संस्थापक आहे. अवघ्या काही काळातच त्याच्या या कल्पनेला खूप प्रतिसाद मिळाला.
मुंबई : 1 डिसेंबर 2023 | ‘चाय सुट्टा बार’ या प्रसिद्ध फ्रँचाइजीचा संस्थापक अनुभव दुबेनं काही दिवसांपूर्वी ‘एक्स’वर (ट्विटर) एक पोस्ट लिहिली होती. ऑफिस मिटींगचा फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये अनुभवने जे लिहिलं, ते काही नेटकऱ्यांना अजिबात आवडलं नाही. अखेर ट्रोलिंगनंतर त्याला स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे. मिटींगचा फोटो पोस्ट करत अनुभवने लिहिलं होतं, ‘आम्हाला 9 ते 5 या वेळेत काम करणाऱ्या ऑफिस कर्मचाऱ्यांची गरज नाही. अजिबातच नाही. आपण इथे आर्मी तयार करतोय.’ या पोस्टमध्ये त्याने आक्षेपार्ह शब्दसुद्धा वापरला होता. यावरूनच नेटकरी त्याच्यावर भडकले होते.
‘शिवीगाळ करून तू कुल ठरत नाहीस आणि चहा विकणं काही मोठी गोष्ट नाही’, असं एकाने सुनावलं. तर आणखी एका युजरने आर्मीच्या पोशाखातील व्यक्तींचा चहा विकतानाचा AI फोटो पोस्ट केला. यावर आता अनुभवने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘इथे मी वापरलेल्या आर्मी या शब्दाचा अर्थ भारतीय सैन्य असा होत नाही. तर आमच्या आऊटलेट्सचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्तार करून देशाला अभिमान वाटावा यासाठी समर्पितपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा एक गट असा अर्थ आहे. कारण आम्ही 2020 पासून परदेशातही आमच्या आऊटलेट्सचा विस्तार करतोय.’
We are not looking for office employees working 9 to 5. No, not at all. We are making f**king Army here. pic.twitter.com/MGBeb9Mk0J
— Anubhav Dubey (@tbhAnubhav) November 27, 2023
9 ते 5 वेळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याविषयी लिहिलेल्या पोस्टबद्दलही अनुभवने स्पष्टीकरण दिलं आहे. “मी नेहमीच कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचा विचार केला आणि 70 तासांच्या वर्क कल्चरचा विरोध केला आहे. तुम्ही माझे जुने व्हिडीओ किंवा मुलाखती तपासू शकता”, असं त्याने म्हटलंय. चहा विकणं काही मोठी गोष्ट नाही असं म्हणणाऱ्यांनाही दुबेनं उत्तर दिलं आहे. ‘होय, आम्ही चहा विकतो. दररोज जवळपास पाच लाख कप चहा विकतो. ज्यामुळे हजारो कुंभारांना आणि कार्यालयात काम करणाऱ्या शेकडो व्यावसायिकांसाठी रोजगार निर्माण होतो. आम्ही दुबई, नेपाळ आणि ओमानमध्येही आऊटलेट उघडले आहेत. येत्या काळात कॅनडा, अमेरिका आणि युकेमध्ये आमचे आऊटलेट्स उघडले जाणार आहेत’, अशी माहिती त्याने दिली.
https://t.co/CdUGMB7sG6 pic.twitter.com/kZl8nLUX0v
— Anubhav Dubey (@tbhAnubhav) November 30, 2023