खुल्लम खुल्ला प्रेम करा, पैसे आम्ही देऊ, अजब कंपनीची गजब रोमांटिक ऑफर; कुठं घडलंय राव?
चीनमधील Insta360 कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना डेटिंग करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे आणि त्यासाठी मोठी रक्कम देत आहे. सिंगल कर्मचाऱ्यांना डेटिंग अॅपवर पोस्ट करण्यासाठी $9 आणि लग्न झाल्यावर $100,000 पेक्षा जास्त बोनस मिळेल. तीन महिने एकत्र राहिल्यावर अतिरिक्त बोनस आणि मैचमेकरलाही बक्षीस मिळेल. कंपनीचा उद्देश कर्मचाऱ्यांचा आनंद वाढवणे आणि त्यांना जोडणे हा आहे. पण यामुळे सोशल मीडियावर "हायरींग सुरू आहे का?" असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
एक काळ होता, जेव्हा मुलांची लग्न वेळेत लावून दिली जायची. घरातील बुजुर्ग मंडळी या कामात पुढाकार घ्यायचे. आपल्या पसंतीची मुलगी किंवा मुलगा शोधायचे आणि बार उडवून द्यायचे. त्याकाळात मुलगा किंवा मुलगी वयात आल्यावरच लग्न लावून देण्यावर भर दिला जायचा. पण आता वातावरण बदललं. शिक्षण आणि करिअर यामुळे मुलं आणि मुली लग्नापासून लांब पळताना दिसत आहेत. करिअरच्या नादात अनेक मुलं आणि मुली लवकर लग्न करत नाहीत. त्यामुळे पालकांना मोठी चिंता वाटताना दिसत आहेत. मुलांची विनवणी करूनही मुलं ऐकत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत.
पण जगात काही जगावेगळ्या घटनाही घडत असतात. पूर्वी आई वडील मुलांच्या लग्नासाठी घाई करायचे. मुला-मुलींवर लग्नाचा दबाव आणायचे. आता तर एका कंपनीनेच अविवाहितांवर लग्नाचा दबाव आणला आहे. चीनमधील एक कंपनी चक्क आपल्या कर्मचाऱ्यांना डेटिंग करण्यासाठी उकसवत आहे. बरं हा दबाव असा तसा नाही, पैशाची लालच दाखवून हा दबाव आणला जात आहे. ऐकायला हे विचित्र वाटेल, पण ही अत्यंत आश्चर्यकारक ऑफर आहे.
आईचं काम कंपनीच्या शिरावर
दक्षिणी चीनमधील एक कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कामावर ‘डेटिंग’चा अनुभव देत आहे. कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लग्न करावं म्हणून कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्यासाठी लालच दिली जात आहे. गुआंगडोंग जनरल लेबर युनियनला अलिकडेच मिळालेल्या माहितीनुसार, शेन्झेनमधील Insta360 नावाच्या कॅमेरा कंपनीने एक रोमँटिक ऑफर सुरू केली आहे. जर एखादा कर्मचारी सिंगल असेल आणि तो आपल्या डेटिंग प्रोफाइलवर डेटिंगसंबंधी पोस्ट टाकत असेल तर त्याला $9 (जवळपास 800 रुपये) दिले जातील, अशी ऑफरच कंपनीने दिली आहे. ही ऑफर 11 नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे आणि आतापर्यंत 500 कर्मचाऱ्यांनी अशी पोस्ट टाकली आहे. कंपनीने डेटिंग करणाऱ्या जोडप्यांना 1 लाख रुपयांहून अधिक रक्कम दिली आहे. जे काम आईने केले पाहिजे, ते काम आता ही कंपनी करताना दिसत आहे.
हायरिंग सुरू आहे का?
विवाह लावून द्यायला कंपनी तयार आहे. इतकंच नाही, तर जर एखाद्या जोडीदाराने तीन महिने एकत्र राहून आपलं नातं मजबूत असल्याचा पुरावा दिला तर त्याला वेगळा बोनस दिला जाणार आहे. तसेच, जोडीला “मैचमेकर”ला 12 हजार रुपयांची रक्कम बक्षिस म्हणून दिली जाणार आहे. कंपनीने सांगितले की, या ऑफरचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांच्या आनंदाला वाव देणे आणि त्यांना दुसऱ्याशी जोडण्याचा अनुभव देणे हा आहे. यावर प्रतिक्रिया देताना एक कर्मचारी म्हणाला की, “माझ्या नात्याबद्दल माझ्या आईपेक्षा जास्त उत्सुकता आता माझ्या कंपनीला आहे.” यावर “इथे हायरिंग सुरू आहे का?”, असा सवाल सोशल मीडियावर काही लोक विचारत आहेत.