महिलेची नवऱ्याविषयी तक्रार, मासेमारीमुळे घटस्फोट!
कल्पना करा घटस्फोटाचं कारण जर मासेमारी असेल तर?
नवरा-बायकोमध्ये भांडण होण्याची अनेक कारणं असतात आणि कधी कधी ही भांडणं इतकं भयंकर रूप धारण करतात की ते घटस्फोटाचं कारण बनतात. पण कल्पना करा घटस्फोटाचं कारण जर मासेमारी असेल तर? असं असेल तर कदाचित हे सर्वात धक्कादायक कारण असेल. अशीच एक घटना चीनमधून समोर आली आहे, जिथे एका महिलेने आपल्या पतीला मासेमारीमुळे घटस्फोट दिलाय.
खरंतर ही घटना चीनच्या एका शहरातील आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, दहा वर्षांपूर्वी एका महिलेनं एका व्यक्तीशी लग्न केलं आणि तिला दोन मुलंही झाली.
स्वत: महिलेने सांगितले की, तिचा नवरा अनेक वर्षे मासेमारी करायचा पण गेले काही दिवस तो रात्रभर मासेमारीसाठी घराबाहेर राहायचा. दरम्यान तिने पतीला खूप समजावले, पण नंतर पतीची मानसिक स्थिती बिघडलीये असं तिला वाटू लागलं.
घरातील सर्व कामे ती एकटीच करते आणि ऑफिसमध्येही जाते आणि तिचा पती रात्री मासेमारीला जातो आणि संपूर्ण रात्र तिथेच घालवतो, असे या महिलेने सांगितले. त्यांना कुटुंबासाठी वेळ नसतो असेही तिने सांगितले.
धक्कादायक बाब म्हणजे, जेव्हा महिलेने घटस्फोटासाठी अर्ज केला तेव्हा तिच्या पतीनेही घटस्फोट घेण्यास होकार दिला. पत्नीच्या तक्रारी आणि कौटुंबिक भांडणांना कंटाळून तो खचल्याचे तो सांगतो.
अखेर दोघांनाही हा करार मान्य झाला, त्यामुळे न्यायाधीशांनी घटस्फोटाचा अर्ज मंजूर केला. ही गोष्ट आता प्रचंड व्हायरल होत आहे.