जगन्नाथ मंदिरात व्हिडीओ बनवणं ‘कर्ली टेल्स’च्या इन्फ्लुएन्सरला पडलं भारी; अटकेची मागणी
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि 'कर्ली टेल्स'ची संस्थापिका कामिया जानीचा जगन्नाथ पुरी मंदिरातील व्हिडीओ चर्चेत आला आहे. बीजू जनता दलाचे नेते व्ही. के. पांडियन यांच्यासोबत तिने मंदिर परिसरात व्हिडीओ शूट केला होता. आता कामियाच्या अटकेची मागणी होत आहे.
मुंबई : 22 डिसेंबर 2023 | सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, ट्रॅव्हल आणि फूड चॅनल ‘कर्ली टेल्स’ची संस्थापिका कामिया जानीला अटक करण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. कामिया ही देशात आणि परदेशात विविध ठिकाणी फिरण्याचे व्हिडीओ शूट करते. पर्यटन स्थळं, तिथलं जेवण या सगळ्यांचे व्हिडीओ ती युट्यूब चॅनलवर पोस्ट करते. तिच्या व्हिडीओंना लाखो व्ह्यूज मिळतात. नुकतीच ती जगन्नाथ पुरी मंदिरात दर्शनाला गेली होती. यावेळीही तिने व्हिडीओ शूट करून तो अपलोड केला. मात्र आता त्याच व्हिडीओमुळे कामियाला भाजपाच्या रोषाला सामोरं जावं लागतंय. कामियाचा जगन्नाथ पुरीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर भाजपाकडून सवाल केला जातोय. तिला मंदिरात कसं जाऊ दिलं, तिला अटक करा अशी मागणी करण्यात येत आहे.
नेमकं काय घडलं?
कामिया ही फूड आणि ट्रॅव्हल व्लॉगर असून खाण्या-पिण्याचे व्हिडीओ ती सतत सोशल मीडियावर शेअर करत असते. गुरुवारी ओडिशामध्ये सत्तेत असलेल्या बीजू जनता दल आणि विरोक्षी पक्ष भारतीय जनता पार्टी यांच्यात मंदिर प्रवेशावरून आणि व्हिडीओ शूट करण्यावरून वाद झाला. कामियाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बीजू जनता दलाचे नेते व्ही. के. पांडियन हे महाप्रसादाचं महत्त्व आणि मंदिर विकासाशी संबंधित माहिती देताना दिसत आहेत. त्यावरून भाजपाने प्रश्न उपस्थित केला आहे.
The sacred sanctity of Puri Srimandir, rich with historical and spiritual heritage, has been shamefully disregarded by VK Pandian, the chairman of 5T, who callously allowed a beef promoter into the revered premises of Jagannath Mandir. @bjd_odisha remains indifferent to the… pic.twitter.com/XGmrQVbFp9
— BJP Odisha (@BJP4Odisha) December 21, 2023
गोमांस खाणाऱ्यांना मंदिर परिसरात एण्ट्री कशी दिली, असा सवाल भाजपाकडून करण्यात येत आहे. भाजपाच्या ओडिशाच्या ट्विटर हँडलवर कामिया आणि व्ही. के. पांडियन यांचा फोटो शेअर करत लिहिलंय, ‘ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा लाभलेल्या पुरी श्रीमंदिराच्या पावित्र्याची 5T चे अध्यक्ष व्ही. के. पांडियन यांनी लज्जास्पदरित्या अवहेलना केली आहे. त्यांनी गोमांसचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीला जगन्नाथ मंदिराच्या पूजनीय आवारात परवानगी दिली. ओडिशाच्या बीजू जनता दलला ओडियाच्या भावना आणि जगन्नाथ संस्कृतीच्या पावित्र्याबद्दल काहीच फरक पडक नाही. या घटनेला जे कोणी जबाबदार आहेत, त्यांना गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल.’
View this post on Instagram
यासोबतच भाजपाकडून व्ही. के. पांडियन आणि कामिया जानी यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. या दोघांना आयपीसी कलम 295 अ अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपाने केली आहे. हा सर्व विरोध पाहता कामिया जानीने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिची बाजू मांडली. ‘एक भारतीय असल्याच्या नात्याने माझं मिशन हे भारतीय संस्कृती आणि वारशाला जगभरात नेण्याचं आहे. मी भारताच्या सर्व ज्योतिर्लिंगांचं आणि चारही धामांचं दर्शन केलं आहे. ही माझ्यासाठी अत्यंत सौभाग्याची गोष्ट आहे. आज सकाळी वर्तमानपत्रात मी माझ्याविषयी विचित्र बातमी वाचली. जगन्नाथ मंदिरातील माझ्या प्रवेशाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आल आहे. मी फक्त इतकंच स्पष्ट करू इच्छिते की मी बीफ खात नाही आणि याआधीही कधी खाल्लं नाही. जय जगन्नाथ’, अशा शब्दांत तिने स्पष्ट केलं.