एक विवाह ऐसा भी.. आकाशात शाही लग्न, विमानात पार पडले विधी; पहा व्हिडीओ
या खास लग्नाविषयी बोलताना वधू म्हणाली, "मी खूपच उत्सुक आहे. मी माझ्या आईवडिलांच्या लग्नाच्या वेळी नव्हते. पण त्यांच्याप्रमाणेच आम्ही काहीतरी रिक्रिएट करू, अशी कल्पनासुद्धा मी केली नव्हती. मी खूप खुश आहे." विधी पोपलेनं प्रायव्हेट जेटमध्ये हृदेश सैनानी याच्याशी लग्न केलं.
दुबई : 27 नोव्हेंबर 2023 | लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. लग्नातील प्रत्येक क्षण आयुष्यभर कायम लक्षात राहण्यासाठी बरीच मेहनत घेतली जाते. काहीजण शाही पद्धतीने लग्न करतात, तर काहींना डेस्टिनेशन वेडिंग करायचं असतं. अशातच दुबईतील एका जोडप्याने मात्र थेट आकाशात लग्नगाठ बांधली आहे. होय.. हे खरंय. दुबईतल्या एका भारतीय जोडप्याने शुक्रवारी चक्क प्रायव्हेट जेटमध्ये लग्न केलं. प्रसिद्ध व्यावसायिक दिलीप पोपले यांची मुलगी विधी पोपलेनं हृदेश सैनानीशी विमानात लग्नगाठ बांधली. हे लग्न जेटेक्स बोईंग 747 एअरक्राफ्टमध्ये पार पडलं. या लग्नात जवळपास 350 पाहुणे सहभागी झाले होते.
दुबईहून ओमानपर्यंत हे विमान उडवण्यात आलं होतं आणि या तीन तासांच्या प्रवासात लग्नाचे विधी पार पडले. हे अनोखं लग्न पाहण्यासाठी 350 पाहुणे विमानात उपस्थित होते. दुबईतील अल मक्तौम एअरपोर्टच्या जेटेक्स व्हीआयपी टर्मिनलवर वरात पोहोचली होती. एअरपोर्टवर वर-वधूचं खास फोटोशूट करण्यात आलं होतं. तर विमानात चढण्यापूर्वी पाहुण्यांना अल्पोपहार दिला गेला.
आता विमानात लग्न कसं पार पडलं, त्यासाठी जागा कुठे असते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर लग्नासाठी हा खास प्रायव्हेट जेट मोडिफाय करण्यात आला होता. म्हणजेच त्याच्या रचनेत काही बदल करण्यात आले होते. लग्नातील पाहुण्यांना सर्व विधी आणि लग्न नीट पाहता यावं यासाठी आत प्रोजेक्टर्ससुद्धा लावण्यात आले होते. लग्नानंतर पाहुणे विमानातच बॉलिवूड गाण्यांवर नाचताना दिसले. हा व्हिडीओ समोर आला आहे.
पहा व्हिडीओ
VIDEO | UAE-based Indian businessman Dilip Popley hosted his daughter’s wedding aboard a private Jetex Boeing 747 aircraft on November 24, in Dubai.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvqRQz) pic.twitter.com/lciNdxrmzz
— Press Trust of India (@PTI_News) November 25, 2023
या लग्नाविषयी वर हृदेश म्हणाला, “माझ्या बालमैत्रिणीसोबत लग्न करण्यासाठी मी खूप खुश आहे. आम्ही दोघांनी एकाच शाळेत शिक्षण घेतलं होतं. जेटेक्समुळे आम्हाला अनोख्या पद्धतीने लग्न करता आलं. मी प्रत्येकाचे आभार मानतो. दिलीप पोपले आणि मुकेश सैनानी या आमच्या पालकांचाही मी ऋणी आहे.”
विशेष म्हणजे 1994 मध्ये विधीचे आईवडीलसुद्धा विमानातच विवाहबद्ध झाले होते. एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये दिलीप पोपले यांनी लग्न केलं होतं. “दुबई हे माझं घर आहे आणि आकाशातील लग्नाचं हे सीक्वेल आहे. माझ्या मुलीसाठी असं काही करायचं माझं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी दुबईपेक्षा चांगली जागा कोणती असूच शकत नाही”, असं दिलीप यांनी सांगितलं.