जगात कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. पृथ्वीवरच्या अनेक गोष्टी अशा आहेत, ज्याबद्दल माणसाला कणभरही कल्पना नाही. त्यातच पृथ्वीवरील समुद्रात असलेल्या अनेक जीवांबद्दल अजून खूपकाही जाणून घेणं बाकी आहे. त्यातील एका माशाचा व्हिडीओ आता समोर आला आहे, जो पाहिल्यानंतर शास्रज्ञांनाही आश्चर्य वाटलं आहे. कारण, या माशाचे डोळे चक्क कपाळाच्या आत आहेत, आणि ते हिरव्या बल्बप्रमाणे चमकतात. कॅलिफोर्नियाच्या मॉन्टेरेच्या खाडीच्या (Monterey Bay) अत्यंत खोलीच्या भागात हा मासा सापडला आहे. (Extremely rare Barrelsys fish sightings in the Pacific Ocean see video )
या विचित्र माशाला आता शास्रज्ञांनी बॅरलआय फिश (Barrelsys Fish) असं नाव दिलं आहे. हा मासा अत्यंत दुर्मिळ असून आतापर्यंत याला पाहिल्याच्या नोंदीही सापडत नाहीत. या माशाचं शास्रीय नाव मॅक्रोपिन्ना माइक्रोस्टोमा (Macropinna Microstoma) असं ठेवण्यात आलं आहे. मॉन्टेरे बे एक्वेरिअम रिसर्च इन्स्टिट्युटच्या (MBARI) शास्रज्ञांना हा आतापर्यंत 9 वेळा दिसला आहे. 9 डिसेंबरलाही शास्रज्ञांना या माशाचं दर्शन झालं. MBARI ने यासाठी रिमोट ऑपरेटेड व्हिईकल म्हणजेच ROV खोल समुद्रात उतरवलं होतं. तेव्हा त्यांना स्क्रिनवर ते पाहायला मिळालं, जे पाहण्याची ते कल्पनाही करु शकत नव्हते. तब्बल 2132 मीटरच्या खोलीवर जिथं प्रकाशाचा कणही नाही, तिथं हा मासा पाहायला मिळाला. ज्या जागी हा मासा सापडला, ही जागा पॅसिफीक समुद्रातील सर्वात जास्त खोलीचं ठिकाण मानलं जातं.
MBARI चे वरिष्ठ शास्रज्ञ थॉमस नोल्स म्हणाले की, आधी तर मला हा छोटा मासा वाटला, पण नंतर कळालं की, मी जगातील सर्वात दुर्मिळ प्राण्याला पाहात आहे. मला विश्वास बसत नव्हता, तो मासा माझ्या डोळ्यासमोर होता. समुद्राचा अभ्यास करणाऱ्या खूप कमी शास्रज्ञांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे. जेव्हा ROV चा प्रकाश माशावर पडला, तेव्हा त्याच्या कपाळावरील हिरव्या रंगाचं पातळ द्रव्य चमकण्यास सुरुवात झाली. या माशाच्या डोळ्यावर हे द्रव्याचं कवच होतं. या माशाला प्रकाश सहन होत नाही, त्यामुळे प्रकाश पाहताच हा इकडे तिकडे पळू लागतो. या माशाच्या डोळ्याच्या समोरच्या भागात छोटे छोटे कॅप्सुल असतात, ज्याद्वारे त्याला कुठल्याही गोष्टीचा वास येतो.
पाहा व्हिडीओ:
I spy with my barreleye, a new #FreshFromTheDeep!
During a dive with our education and outreach partner, the @MontereyAq, the team came across a rare treat: a barreleye fish (Macropinna microstoma). pic.twitter.com/XjYj04MOCt
— MBARI (@MBARI_News) December 9, 2021
हा मासा जपानच्या बोरिंग समुद्रापासून ते कॅलिफोर्नियाच्या खोल समुद्रापर्यंत सापडतो. 650 फूटांपासून ते 3300 फूट खोल समुद्रात या माशाची नोंद झाली आहे. यांची संख्या किती असेल याचा अंदाज अजून शास्रज्ञाना आलेला नाही, कारण हा फारच दुर्मिळ मासा आहे. हा मासा शिकारीसाठी बाहेर पडत नाही. एकाच जागेवर हा पडून राहतो, आणि जेव्हा कुठलीही जेलीफीश वा छोटा मासा याच्या पट्ट्यात येतो, तेव्हा हा हल्ला करुन त्याचा शिकार करतो. आता या माशाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
हेही पाहा: