सोलापुरात ‘शरद मँगो’, 3 किलोच्या आंब्याला चक्क शरद पवारांचंच नाव; पेटंटही मिळालं
सोलापुरातील माढा तालुक्यातील अरन गावातील शेतकरी दत्तात्रय घाडगे यांनी आपल्या शेतात तीन किलो वजनाचा आंबा पिकवला आहे. या आंब्याला त्यांनी 'शरद मँगो' असे नाव दिले आहे. घाडगे यांनी विविध प्रकारच्या आंब्यांवर ग्राफ्टिंग करून आणि होमिओपॅथिक खतांचा वापर करून हा आंबा पिकवला आहे.

सोलापुरातील माढा तालुक्यातील अरन गावच्या शेतकऱ्याने तर कमालच केली आहे. दत्तात्रय घाडगे नावाच्या या शेतकऱ्याने आपल्या शेतात आंब्यावर विविध प्रयोग करत तीन किलोचा आंबा पिकवला आहे. त्याने या आंब्याला चक्क ‘शरद मॅंगो’ असं नाव दिलं आहे. शरद पवार यांच्यावरी अतुट भक्तीमुळेच त्याने या आंब्याला शरद पवार यांचं नाव दिलं आहे. त्यामुळे हा आंबा पाहण्यासाठी सोलापुरात आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही लोक येत असून घाडगे यांच्या आंब्याला मोठी मागणी आली आहे.
दत्तात्रय घाडगे यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या आंब्याचं वजन तीन किलो आहे. आमच्या शेतात विविध प्रकारचे आंबे लावले आहेत. केसर, झाडी आणि केळी याच्यावरही ग्राफ्टिंग प्रयोग केला आहे. ही शेती करण्यासाठी शरद पवार मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या योजनेचा आधार घेतला. या अनोख्या आंब्याला पेटंटही मिळाल्याचं दत्तात्रय घाडगे यांनी सांगितलं.
10 हजार आंबे
शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी फळबाग योजना राबवली होती. या योजनेच्या अंतर्गत घाडगे यांनी आठ एकर शेतात 10 हजार केसर आंब्याची रोपं लावली होती. ही रोपं चांगलीच मोठी झाली आहेत. आंब्याचं उत्पादनही मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळेत घाडगे यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांचं नाव या आंब्याला दिलं आहे.
तो प्रयोग यशस्वी
तीन किलोचा आंबा उगवण्यासाठी आम्ही एकाच रोपावर विविध प्रकारच्या आंब्यावर ग्राफ्टिंग केलं. यात केसर आंब्यावर विविध प्रकारचे प्रयोग केले. होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापर केला. त्याचा यशस्वी वापर झाल्याने प्रयोग यशस्वी ठरला. देशात पहिल्यांदाच अडीच किलोचा आंबा उत्पादन झालं आहे. हा आंबा बारामतीतील कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनाही दाखवण्यात आल्याचं घाडगे यांनी सांगितलं.
पेटंट मिळालं
माढा तालुक्यातील अरन गावच्या या शेतकऱ्याने तीन किलो वजनाचा नवीन आंबा उत्पादित केला आहे. आपल्या कल्पकतेतून त्याने हा आंबा उगवल्याने त्याने या आंब्याला शरद मँगो अर्थात शरद आंबा असे नाव दिलं आहे. विशेष म्हणजे घाडगे यांना या आंब्याचं पेटंटही मिळालं आहे.