अरारा… कॉलेजच्या फंक्शनमध्ये प्रिन्सिपल मॅडमचा खतरनाक डान्स, कॉलेज तरूणीही फिक्या
कॉलेज फेस्टिव्हलमध्ये तुम्ही कधी मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिकांना डान्स करताना पाहिलंय का? अशाच एका व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्टेजवर रॅम्प वॉक आणि डान्स करताना दिसत आहेत.
नवी दिल्ली : 24 फेब्रुवारी 2024 | शाळा किंवा कॉलेजचे ‘मुख्याध्यापक’ म्हटल्यावर डोळ्यांसमोर अत्यंत गंभीर चेहरा समोर येतो. एकेकाळी शाळा-कॉलेजमध्ये मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिकांचा वचक पाहून विद्यार्थ्यांची घाबरगुंडी उडायची. मात्र सध्या अनेक शाळा-कॉलेजमधील हे चित्र बदललेलं पहायला मिळतं. सध्याचे मुख्याध्यापक शाळेतील विद्यार्थ्यांसोबत अत्यंत मैत्रीपूर्ण वागताना आणि बोलताना दिसतात. हा बदल विद्यार्थ्यांनाही खूप आवडला आहे. सध्या असाच काहीसा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये दिल्ली विद्यापिठाच्या ‘Reverie’ या फेस्टिव्हलमध्ये गार्गी कॉलेजच्या मुख्याध्यापिका चक्क विद्यार्थिनींसोबत रॅम्पवॉक आणि डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वच मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका स्वभावाने खूपच कडक असतात, असं तुम्ही म्हणणार नाही.
इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून ‘रेव्हरी’ने मुख्याध्यापिकांनाही नाचण्यास भाग पाडलं, असं कॅप्शन त्याला देण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. मुख्याध्यापिकांच्या ‘कडक स्वभावाच्या’ चौकटीबाहेर पडून विद्यार्थिनींसोबत क्षण एंजॉय केल्याबद्दल अनेकांनी त्यांचं कौतुक केलं आहे. हा नवीन बदल खूपच चांगला आहे, असंही काहींनी म्हटलंय. तर कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकत असं काहीतरी वेगळं केल्याबद्दल अनेकांनी प्रशंसाही केली आहे.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
या व्हायरल व्हिडीओमध्ये दोन विद्यार्थिनींसोबत मुख्याध्यापिका रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. त्यानंतर त्या काही डान्सच्या स्टेप्ससुद्धा करतात. यावेळी उपस्थित एकच जल्लोष करतात. ‘अशा मुख्याध्यापिका आमच्या काळी का नव्हत्या’, असा मजेशीर सवाल एका युजरने केला. तर ‘या सर्वांत कूल मुख्याध्यापिका आहेत’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘आम्हालासुद्धा अशा कूल मुख्याध्यापिका हव्या आहेत’, असंही काहींनी लिहिलं आहे.