विमानात मोफत एक्स्ट्रा फूड कसे मिळवावे, केबिन क्रूने स्वत: सांगितल्या टिप्स!
विमानात जेवण दिल्यानंतरही एखाद्या प्रवाशाला भूक लागली असेल तर त्याला केबिन क्रू कडून मोफत जेवण मिळू शकते का? केबिन क्रूने स्वत: या टिप्स सांगितल्या
जर तुम्ही विमानातून प्रवास करत असाल आणि तुम्हाला भूक लागते, त्यातही जर तुमच्याकडे पैसे नसतील किंवा तुम्हाला ते खर्च करायचे नसतील तर ही बातमी तुमच्यासाठीच. साहजिकच अशा परिस्थितीत तुम्हाला उपाशी बसण्याशिवाय पर्याय नसतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही विमानात पैसे खर्च न करता केबिन क्रू कडून मोफत खाद्यपदार्थ मिळवू शकता. एका नामांकित विमान कंपनीत काम करणाऱ्या केबिन क्रूने स्वत: या टिप्स सांगितल्या आहेत.
ब्रिटीश वेबसाईट ‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका हवाई प्रवाशाने आपल्या सहलीपूर्वी सोशल मीडियावर याबाबत प्रश्न विचारला होता. विमानात जेवण दिल्यानंतरही एखाद्या प्रवाशाला भूक लागली असेल तर त्याला केबिन क्रू कडून मोफत जेवण मिळू शकते का? यावर लोकांनी त्याला अनेक टिप्स दिल्या.
युरोप आणि आशिया दरम्यान कार्यरत असलेल्या एका विमान कंपनीच्या केबिन क्रूने सांगितले की, पहिल्यांदा जेवण मिळाल्यानंतरही त्याला भूक लागल्यास मोफत अतिरिक्त अन्न मिळू शकते. त्यासाठी त्याला विमानात उपस्थित असलेल्या सर्व प्रवाशांना जेवण मिळण्याची वाट पाहावी लागेल.
जेव्हा सर्व प्रवाशांना जेवण वाटप केले जाईल, तेव्हा त्याला केबिन क्रू ला भेटून नम्र शब्दात विनंती करावी लागेल. त्याला केबिन क्रूला सांगावे लागेल की त्याला अजून भूक लागली आहे. जेवण शिल्लक असेल तर प्लिज सर्व्ह करा.
महिला केबिन क्रूने सांगितले की, प्रवाशाला मोफत अतिरिक्त जेवण मिळण्यासाठी ठोस कारण देखील द्यावे लागेल. जसं की त्याच्या पहिल्या विमानाला उशीर झाला, ज्यामुळे तो वेळेवर जेवू शकला नाही.
तो असेही म्हणू शकतो की त्याला हा पदार्थ खूप आवडला आणि तो अजून खाण्याची त्याची इच्छा आहे. बिझनेस क्लासमध्ये दिल्या जाणाऱ्या खास पदार्थांऐवजी इतर खाद्यपदार्थांची मागणी केली तर ती मिळण्याची शक्यताही जास्त असते.