टेक्सास: अमेरिकेत भारतीय वंशाच्या महिलांवर वर्णद्वेषातून हल्ला (Racist Rant) करण्यात आल्याची लाजीरवाणी बाब समोर आली आहे. एका अमेरिकन-मेक्सिन (American-Mexican) महिलेने टेक्सासच्या रस्त्यावर फिरत असलेल्या 4 भारतीय महिलांना अपमानजनक वागणूक दिली. त्यांना मारहाणही करण्यात आली तसेच त्यांना बंदूक दाखवून मारुन टाकण्याची धमकीही देण्यात आली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल (Social Media Viral Video) झाल्यानंतर मेक्सिको पोलिसांनी या आरोपी महिलेला अटक केली आहे.
ही घटना बुधवारी रात्री घडली आहे. टेक्सासच्या डेल्लास शहरात 4 भारतीय वंशाच्या महिला हॉटेलमध्ये जेवण झाल्यानंतर पार्किंगच्या दिशेने जात होत्या. त्याचवेळी अचानक एक मेक्सिकन-अमेरिकन वंशाची महिला तिथे आली. तिने या भारतीय महिलांना अपशब्द वापरत त्यांचा अपमान करण्यास सुरुवात केली. ही महिला त्यांना म्हणाली की – मी भारतीयांचा द्वेष करते. सगळे भारतीय अमेरिकेत चांगल्या जगण्याच्या शोधात येतात. त्यानंतर ही महिला सातत्याने या भारतीय महिलांना शिव्या देत राहिली. ही आरोपी महिला पुढे म्हणाली की, मी अमेरिकेत जन्माला आले, पण जिथेही मी जाते त्या ठिकाणी मला भारतीयच जास्त दिसतात. जर भारतात चांगले आयुष्य असेल तर तुम्ही ते सोडून इथे का येता.
A racist woman in Texas harasses a group of Indian people just for having accents.
This behavior is absolutely repulsive. pic.twitter.com/ZvX3mdQ6Wm
— Fifty Shades of Whey (@davenewworld_2) August 25, 2022
या घटनेचा व्हिडीओ एका व्यक्तीने सोशल मीडिया पोस्ट करताना लिहिले आहे की, माझी आई आणि त्यांच्या ३ मैत्रिणी डेल्लासमध्ये डिनरसाठी बाहेर गेल्या होत्या. पार्किंगकडे परतत असताना तिथे एक मेक्सिन-अमेरिकन महिला आली. तिने चारही जणांविरोधात वर्णद्वेषी वक्तव्ये केली आणि त्यानंतर शिवीगाळही केली. माझी आई त्या महिलेला असे बोलू नका, असे आवाहन करीत होती. मात्र तरीही अमेरिकन महिला थांबेना, त्यानंतर आईने तिचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरु केल्याचे पाहिल्यानंतर ही महिला आणखी भडकली आणि तिने आई आणि तिच्या मैत्रिणींना मारहाण करण्यास सुरुवात केली.
या आरोपी मेक्सिकन-अमेरिकन महिलेची ओळख पटली असून, ती टेक्सासच्या प्लानो शहरातील रहिवासी आहे. एस्मेराल्डा ऑप्टन असे तिचे नाव आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, टेक्सासच्या प्लानो शहरात पोलिसांनी महिला एस्मेराल्डा ऑप्टन हिला दुपारपर्यंत अटक केली. एस्मेराल्डाला 10 हजार अमेरिकन डॉलर्सचा दंड आकारण्यात आला आहे. तिच्याविरोधात वर्णद्वेषी हल्ला आणि दहशतवादी हल्ल्याची धमकी दिल्याचा गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. प्लानो आणि डेल्लास यातील अंतर केवळ ३१ किमी आहे. सोशल मीडियावर हा व्हायरल झाल्यानंतर अमेरिकेत राहणाऱ्या भारतीयांनी आणि अमेरिकी समुदायानेही यावर तीव्र संतापजनक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
आशियाई वंशाच्या अमेरिकन नेत्य़ा रीमा रसूल यांनीही या प्रकरणी ट्विट केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की- हा घाबरवणारा अनुभव होता. या महिलेजवळ बंदूकही होती, आणि ती त्याने भारतीय महिलांना गोळी मारु इच्छित होती. या भारतीय महिलांच्या इंग्रजी भाषेच्या लहेजावर तिला आक्षेप होता. या आरोपी महिलेवर या घृणास्पद अपराधासाठी खटला चालवण्यात यायला हवा.