एक तोळा सोन्याच्या भावात खेकड्याची डिश, बिल पाहताच महिला बिथरली; पुढे काय झालं?
एका हॉटेलात जेवण करणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. मनपसंत डिश मागवल्यानंतर त्या डिशचं जे बिल आलं ते पाहून तिला भोवळच आली. बिल इतक होतं की तिने थेट पोलिसांनाच रेस्टॉरंटमध्ये बोलावलं.
सिंगापूर | 22 सप्टेंबर 2023 : समजा तुम्ही एकटेच हॉटेलात गेलात आणि एखादी डिश मागवली तर त्याचं बिल किती होईल? फार फार 500 ते 1000 रुपये होईल. गेला बाजार 2 हजार होईल. त्याच्या पलिकडे तर होणार नाही ना? कारण एक माणूस असं किती खाऊ शकतो? पण तुम्हाला जर एका डिशचे पैसे भरमसाठ आले तर…? एक तोळा सोनं विकत घेता येईल एवढ्या किंमतीला जर एक डिश पडली तर? तुमच्या पायाखालची जमीन सरकणारच ना… एका महिलेच्या पायाखालची जमीनही सरकली आहे. जेव्हा तिने डिश विकत घेतली तेव्हा बिल पाहिले तेव्हा तिला फक्त भोवळ यायची बाकी होती.
भारतात साधारणपणे खेकडे 200 ते 400 रुपये डझन मिळतात. पण एका महिलेला हेच खेकडे काही हजारात पडले. एक जापानी महिला सिंगापूरला फिरायला आली होती. एका रेस्टॉरंटमध्ये तिने खेकड्याची डिश मागवली. डिश फस्त केल्यानंतर तिला बिल आलं आणि तिला गरगरायलाच लागलं. या महिलेला 57 हजार रुपयांचं बिल देण्यात आल होतं. एक तोळा सोनं विकत घेता येईल एवढं हे एका डिशचं बिल होतं. विशेष म्हणजे तिच्याकडून हे बिल वसूलही करण्यात आलं. न्यूयॉर्क पोस्टने ही बातमी दिली आहे.
वेटर म्हणाला म्हणून…
या महिलेचं नाव जुंको शिनबा असं आहे. 15 सप्टेंबर रोजी तिच्याबाबत हा प्रकार घडला. सिंगापूरमधील प्रसिद्ध चिली क्रॅब डिश खाण्यासाठी ती एका हॉटेलात गेली होती. पण रेस्टॉरंट मालकाने तिच्याकडून खेकड्याच्या डिशची एवढी किंमत मागवली की तिने पोलिसांनाच थेट हॉटेलात बोलावलं. रेस्टॉरंटमधील एका वेटरने मला अलायस्कन किंग क्रॅब चिलीची डिश ट्राय करायला सांगितली. या डिशची किंमत फक्त 30 डॉलर म्हणजे 25 हजार रुपये असल्याचं सांगितले. पण त्याने फक्त 100 ग्रॅम खेकड्यांची ही किंमत आहे हे सांगितलं नाही, असा दावा या महिलेने केला आहे.
आधी ताव मारला, मग…
वेटरच्या सांगण्यानुसार या महिलेने अलास्कन किंग क्रॅब चिली डिशची ऑर्डर दिली. तिच्यासोबतच्या तिच्या सहकाऱ्यांनी वेगवेगळ्या पदार्थांची ऑर्डर दिली. ऑर्डर आल्यानंतर या सर्वांनी खेकड्यांवर मस्त ताव मारला. पण जेव्हा बिल आलं तेव्हा सर्वच हैराण झाले. त्यांचं एकूण बिल 1322 डॉलर म्हणजे 80 हजार रुपये झालं होतं. त्यात एकट्या अलास्का किंग क्रॅब डिशची किंमत 938 डॉलर म्हणजे 57 हजार रुपये होती. तर इतर डिशेसची किंमत 20 डॉलरपेक्षा कमी होती.
हॉटेलकडून सवलत
चार लोकांच्या एका डिनरचा एवढा खर्च आम्हाला अपेक्षित नव्हता. खेकड्यांची डिश देण्यापूर्वी खेकड्यांच्या वजनाची माहिती देण्यात आली नव्हती. त्यांनी थेट खेकडा बनवून माझ्यासमोर वाढला, असं या महिलेचं म्हणणं आहे. दरम्यान, या महिलेकडे खेकड्याचं बिल देण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. त्यामुळे हॉटेलने तिला 107 डॉलरची सूट दिली आणि तिच्याकडून बाकीचे पैसे वसूल केले.