दोन लाखांच्या ब्रँडेड बॅगेमुळे जया किशोरी तुफान ट्रोल; आता म्हणाल्या “मी साध्वी नाहीच..”
कथावाचक जया किशोरी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये जया किशोरी यांच्या हातात दोन लाख रुपयांची ब्रँडेड बॅग दिसली होती. यावरून नेटकऱ्यांनी त्यांना खूप ट्रोल केलं होतं. त्यावर आता त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
प्रसिद्ध कथावाचक जया किशोरी यांचा एअरपोर्टवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला होता. या व्हिडीओमध्ये त्यांच्या हातातील ‘डीओर’ (Dior) या ब्रँडची बॅग तब्बल दोन लाख रुपयांची असल्याचं म्हटलं गेलं होतं. मोह मायेच्या अधीन जाऊ नका, अशी शिकवण देणाऱ्या कथावाचक स्वत: इतकी महागडी बॅग वापरतात, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती. या ट्रोलिंगवर आता जया किशोरी यांनी उत्तर दिलं आहे. “मी सर्वसाधारण मुलगी आहे, मी साध्वी नाही” असं त्यांनी स्पष्ट केलंय. 29 वर्षीय जया किशोरी यांचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. तरुण वर्गात त्यांचे व्हिडीओ, त्यांच्या कथा खूप प्रसिद्ध आहेत.
‘डिओर’ या ब्रँडचे बॅग वासराच्या कातडीपासून बनवले जातात. त्यामुळे त्यांनी या ब्रँडचा बॅग वापरणं चुकीचं असल्याचं अनेकांनी म्हटलं होता. मात्र ही बॅग आपण स्वत:साठी कस्टमाइज्ड करून घेतली असून त्यात कोणत्याही प्रकारचं लेदर वापरलं गेलं नाही, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी म्हटलंय, “ही बॅग कस्टमाइज्ड आहे. त्यात लेदर वापरलं गेलं नाही आणि कस्टमाइज्डचा अर्थ हाच असतो की तुम्ही तुम्हाला हवी तशी ती बनवून घेऊ शकता. म्हणूनच त्याच माझं नावसुद्धा लिहिलेलं आहे. मी कधीच चामड्याच्या बॅगेचा वापर केला नाही आणि कधी करणारही नाही.”
#WATCH | Kolkata: On the controversy over carrying an expensive handbag, Spiritual orator Jaya Kishori says, “The bag is a customised bag. There is no leather in it and customised means that you can get it made as per your wish. That is why my name is also written on it. I have… pic.twitter.com/TCRlumJ2R4
— ANI (@ANI) October 29, 2024
“जे लोक माझ्या कथेला येतात, त्यांना ही गोष्ट खूप चांगल्याप्रकारे माहीत आहे की मी कधीच असं म्हणत नाही, सर्वकाही मोहमाया आहे, पैसे कमवू नका किंवा सर्वकाही सोडून द्या. मी सर्वकाही सोडून दिलं नाही, तर इतरांना तशी शिकवण कशी देऊ शकते? पहिल्या दिवसापासून मी हे स्पष्ट केलंय की मी संत, साधू किंवा साध्वी नाही. मी सर्वसामान्य मुलगी आहे आणि एका सर्वसामान्य घरात माझ्या कुटुंबीयांसोबत राहते. मी तरुणांना हेच सांगेन की मेहनत करा, पैसे कमवा आणि स्वत: एक चांगलं आयुष्य जगा, तुमच्या कुटुंबीयांना चांगलं आयुष्य द्या, तुमची स्वप्न पूर्ण करा”, असं त्या पुढे म्हणाल्या.
जया किशोरी यांनी आपली बाजू मांडण्यासाठी कृष्ण आणि अर्जुनाची गोष्ट सांगितली. “देवाने अर्जुनाला सर्वकाही त्याग करून जंगलात जायला सांगितलं नव्हतं. उलट देवाने अर्जुनाला त्याचं कर्म करण्यास सांगितलं होतं. अध्यात्माचा खरा अर्थ असा नाही की तुम्ही वस्तू विकत घेऊ नये, पण वस्तूंनी तुम्हाला विकत घेऊ नये. माझी संपत्ती ही कधीच माझी ओळख असू शकत नाही. आमच्याकडे काहीही नसतानाही आम्ही तितकेच खुश होतो”, असं जया किशोरी यांनी सांगितलं.