हे पत्र वाचून फाडून टाक! सरकारी शाळेतील शिक्षकाचं विद्यार्थिनीला प्रेमपत्र
एका सरकारी शाळेतील 47 वर्षीय शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला हे पत्र लिहिले आहे.
कन्नौज, उत्तर प्रदेश: प्रेम करणं चुकीचं नाही, पण सर्व मर्यादांचं उल्लंघन करून चुकीच्या गोष्टी करणं हा गुन्हा असतो. अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात एका सरकारी शाळेतील शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमपत्र लिहिलं आहे. या प्रेमपत्रात त्यांनी अशी भाषा वापरली होती की त्यांनंतर विद्यार्थिनीचे कुटूंब पत्रासहित पोलीस स्टेशनला पोहोचले.
खरं तर ही घटना उत्तर प्रदेशातील कन्नौजमधील आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका सरकारी शाळेतील 47 वर्षीय शिक्षकाने आपल्या अल्पवयीन विद्यार्थिनीला हे पत्र लिहिले आहे.
हे प्रेमपत्र सोशल मीडियावरही व्हायरल झालं आहे. 12 ओळींचे हे प्रेमपत्र या शिक्षकाने लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पत्र वाचून फाडून टाकण्यास सांगण्याबरोबरच आपलं प्रेम व्यक्त केलं. त्याने आपला मोबाइल क्रमांकही लिहिला आहे.
माहितीनुसार, पीडित मुलगी 8 वीची विद्यार्थिनी असून ती गावातील ज्युनिअर हायस्कूलमध्ये शिकायला जाते, असे तिच्या वडिलांनी सांगितले.
तिथे शिक्षक हरी ओम सिंग आपल्या मुलीवर वाईट नजर ठेवत असत आणि त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. हे पत्र घेऊन ते सर्व जण पोलीस ठाण्यात पोहोचले. या कुटुंबाने शिक्षकावर विनयभंगाचा आरोप केला असून याप्रकरणी कारवाईची मागणी केलीये.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्तानुसार, एसपी कुंवर अनुपम सिंह यांनी सांगितलं की, कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी एक टीम तयार करण्यात आली आहे.
हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असं लिहिलं आहे. सुट्ट्यांमध्ये तुमची खूप आठवण येईल. आम्ही तुमच्यावर खूप प्रेम करू. जर तुझ्याकडे फोन असेल तर मला फोन कर.
इतकंच नाही तर सुट्टीच्या आधी एकदा येऊन भेट, भेटायला आलीस तर तुझं माझ्यावर प्रेम आहे असं मी समजेल. असंही त्यांनी त्यात लिहिलं होतं. शक्य असेल तर मला कळव आणि मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. हे पत्र वाचून फाडून टाक आणि कोणालाही देऊ नको. असंही या पत्रात लिहिण्यात आलंय.