केतकी चितळेच्या फेसबुक पोस्टपेक्षा त्यावरील कमेंट्सचीच चर्चा! “ताई 55 मोर्चे शांततेत काढले होते त्यावेळी झोपला होतात का?”
मराठा आरक्षणाचं आंदोलन हळूहळू हिंसक रूप धारण करतंय. या आंदोलनात बीडमध्ये माझलगाव नगरपरिषदेचं कार्यालय फोडलं गेलं, जाळपोळ केली गेली. माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला काही आंदोलकांनी आग लावली. आमदार प्रकाश सोळंकी आणि आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावली गेली.
मुंबई: मराठा आरक्षणासाठी राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं सुरु आहेत. कुठे कुणी उपोषणाला बसलंय, तर कुठे चक्काजाम आंदोलन झालंय. लोकांनी रस्ते अडवलेत तर कुठे आंदोलनाने हिंसक रूप धारण केलंय. मनोज जरांगे पाटलांचं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शांततेत सुरु झालेलं हे आंदोलन हळूहळू आता आंदोलकांचा संयम सुटत चाललाय. सरकार देखील या विषयावर सातत्याने चर्चा करतंय, सतत बैठका सुरु आहेत. काल 1 नोव्हेंबरला तर काही आमदारांनी सुद्धा मंत्रालयाच्या दारात बसून मराठा आरक्षणाची मागणी केली, तिथेही गोंधळ झाला. यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक काल पार पडली. बैठकीतून काही साध्य झालं नसल्याची प्रतिक्रिया जरांगे पाटलांनी दिली आणि सरकारला किती वेळ हवाय? सरकार वेळ घेतल्यावर सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. आता इतकं सगळं राज्यात सुरु असताना केतकी चितळेने यात उडी घेतलीये. तिने फेसबुकवर एक पोस्ट केलीये त्यावर नेटकऱ्यांनी खूप कमेंट्स केल्यात.
नेटकऱ्यांचा संताप
मराठवाड्यात अनेक ठिकाणी सुरक्षिततेच्या कारणास्तव संचारबंदी, शहरबंदी करण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पसरुन आंदोलनाला हिंसक वळण लागू नये यासाठी राज्य सरकारने तीन जिल्ह्यांमध्ये सध्या इंटरनेट बंद केलंय. सरकार सगळ्या प्रकारची खबरदारी घेत असतानाच केतकी चितळेने फेसबुकवर अशी पोस्ट केलीये की जी बघून नेटकऱ्यांचा संताप उडालाय.
प्रतिक्रियांची जबरदस्त चर्चा
तुम्ही केतकी चितळेने एक दिवसआधी फेसबुकवर केलेली पोस्ट पाहिलीच असेल. यात तिने एक व्हिडीओ टाकलाय ज्यात एक माणूस एसटी बसच्या काचेवर दगडफेक करतो. आता केतकीने हे पोस्ट करताना, “एसटी बस फोडून आरक्षण कसं मिळते बुवा?” असा प्रश्न केलाय. ही पोस्ट बरीच चर्चेत होती. पण आता या पोस्टच्या खाली आलेल्या लोकांच्या प्रतिक्रियांची जबरदस्त चर्चा आहे.
काय आहेत कमेंट्स?
यात एकाने लिहिलंय, “Live येऊन debate करता का ताई मग सांगतो? इतका अभ्यास असेल तर चर्चा करू”, दुसरा लिहितो, “55 मोर्चे शांततेत काढले होते त्यावेळी सरकार आणि तुम्ही झोपले होते का?”. इतकंच नाही तर एकजण केतकीला समजावताना लिहितो, “सध्या वातावरण खराब आहे अशा पोस्ट नका करू plzz”. अजून एकजण लिहितो, “बरे त्यासाठी तुम्ही लढा, एकतर आरक्षण द्या किंवा सगळ्यांचेच कॅन्सल करा”. केतकीने केलेल्या या पोस्टवर लोकांच्या प्रतिक्रियाच वाचण्यासारख्या आहेत. यात तिला सातत्याने एक गोष्ट सांगण्यात आलीये, “सध्या वातावरण गरम आहे, शांतता राखा!”