मॅगी विकतोय की भाजी? व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल चकीत!
रस्त्यावर एखाद्या भाजीपाल्याप्रमाणे मॅगी विकणाऱ्या व्यक्तीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओला कोट्यवधी व्ह्यूज मिळाले आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर काय वाटलं, ते कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा..
मुंबई : 15 मार्च 2024 | मॅगी हा अनेकांच्या आवडीचा स्नॅक्स आहे. अगदी सकाळी नाश्त्यापासून ते दिवसभरात कधीही भूक लागली किंवा काहीतरी झटपट बनवून खायची इच्छा झाली तर मॅगी हा पदार्थ आवर्जून अनेकजण बनवून खातात. गेल्या अनेक वर्षांपासून आपण ही मॅगी छोट्या आणि मोठ्या पाकिटांमध्ये विकत घेतो. पण रस्त्यावर भाजी विकतो तशी ही सुट्टी मॅगी विकल्याचं तुम्ही कधी पाहिलंय किंवा ऐकलंय का? सोशल मीडियावरील हा व्हिडीओ पाहून तुम्हीही चकीत व्हाल. गाडीवर भाजी विकावी तसा हा माणूस चक्क मॅगी विकतोय. सुट्टी मॅगी वजन करून त्यानुसार त्यात मसाल्याची पाकिटं टाकून तो ग्राहकांना विकतोय.
आजवर ‘फँटा मॅगी’, ‘मॅगी आइस्क्रीम’, ‘कोरियन स्टाइल मॅगी’ असे मॅगीचे विविध प्रकार आपण पाहिले आहेत. पण रस्त्यावर सुट्टी मॅगी विकण्याचा अजब प्रकार पहिल्यांदाच समोर आला आहे. आपण जेव्हा दुकानातून मॅगी विकत घेतो, तेव्हा ती पाकिटात एका आकारात येते आणि त्यासोबत मॅगी मसाल्याचं पाकिट असतं. मात्र व्हायरल व्हिडीओतील हा व्यक्ती चुरा केलेला मॅगी ग्राहकांना वजन काट्यावर मापून त्यात मसाल्याची पाकिटं टाकून विकतोय. खरंतर अशा पद्धतीने गाडीवर सहसा आपण भाजी, फळं किंवा अगदी शेंगदाणे विकताना पाहिलंय. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रियांचा वर्षाव होतोय.
पहा व्हिडीओ
View this post on Instagram
‘मुदत संपलेली मॅगी अशा पद्धतीने विकली जात आहे. कृपया ती विकत घेऊ नका’, असं एकाने म्हटलंय. तर ‘हे फॅक्ट्रीतून काढून टाकण्यात आलेलं असावं. तीच तो रस्त्यावर विकतोय’, असा अंदाज दुसऱ्या युजरने वर्तवला आहे. ‘या मॅगीत धुळीचा फ्लेवर मोफत मिळेल’, अशी उपरोधिक कमेंटही नेटकऱ्याने केली आहे. ‘मॅगी विकायची पद्धत थोडी कॅज्युअल आहे’, अशीही कमेंट पहायला मिळतेय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून आतापर्यंत त्याला 4 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
भारतात ‘मॅगी’ कधी आली?
1984 मध्ये मॅगीने भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यावेळी नेस्ले या कंपनीलाही अशी अपेक्षा नव्हती की, त्यांच्या उत्पादनाला देशभरात इतकी लोकप्रियता मिळेल. दरवर्षी नेस्ले इंडिया जाहिरातींवर तब्बल 100 कोटी रुपये खर्च करते आणि त्यातील प्रमुख भाग म्हणजे मॅगी. 1999 पासून भारतातील मॅगीची संपूर्ण बाजारपेठ बदलली. याच काळात मॅगीने भारतातील सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. ऑक्टोबर 2008 मध्ये मॅगीपासून स्नायू आणि हाडांना इजा होण्याचा धोका असल्याचं सांगून ब्रिटनच्या अॅडव्हर्टायझिंग स्टँडर्ड अथॉरिटीने (ASA) बंदी घातली होती.