गरिबांसाठी पोटतिडकी, सायकलीवर चक्क 1700 किमीचा प्रवास, मणिपूरच्या पठ्ठ्याची अनोखी कहाणी
फिलेम रोहनने गरजवंतांच्या मदतीसाठी अनेक मोहिम राबवल्या आहेत (Manipur Cyclist Philem Rohan Singh cycles to raise funds for needy).
इम्फाळ (मणिपूर) : काही लोकांमध्ये समाजसेवा ही नसानसात भिनलेली असते. अशाच एका तरुण समाजसेवकाची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. विशेष म्हणजे भूकेलेल्या गरीब नागरिकांसाठी हा तरुण सायकलीवरुन शेकडो किलोमीटरचा प्रवास करतो. जवळपास 2018 पासून त्याची अशाप्रकारची समाजसेवा सुरु आहे. या तरुणाचं नाव फिलेम रोहन सिंह असं आहे. हा तरुण आपल्या ग्रूपसह शेकडो नागरिकांना अन्नदान करतो. त्यासाठी त्याने चक्क 1700 किमीचा प्रवास केला, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेकांकडून त्याचं कौतुक होत आहे (Manipur Cyclist Philem Rohan Singh cycles to raise funds for needy).
फिलेम रोहन कोलकाता ते चेन्नई सायकलीने प्रवास करणार
फिलेम रोहनने गरजवंतांच्या मदतीसाठी अनेक मोहिम राबवल्या आहेत. लॉकडाऊन काळात तर त्याने सायकलीवरुन देशाचा बराच भाग पिंजून काढत लोकांना मदत केली. फिलेम 6 मार्चला आपल्या सायकलीच्या नव्या अभियानाअंतर्गत थेट हैदराबादला पोहोचला. तिथे त्याने अनेकांशी बातचित केली. तो गरिबांच्या मदतीसाठी फंडदेखील गोळा करत आहे. त्याने गेल्या अभियानात जवळपास 17 हजार किमीचा सायकलीवरुन प्रवास केला होता. आता त्याचा कोलकाता ते चेन्नई आणि मुंबईहून दिल्लीच्या रस्त्याला जाण्याची तयारी आहे. या फिरस्तीमागे सर्वसामान्य, गरजू, गरिबांना अन्न मिळावं, अशीच त्याची पोटतिडकी आहे.
स्वखर्चाने गरिबांना मदत
विशेष म्हणजे रोहन आणि त्याचा ग्रुप स्वखर्चाने लोकांची मदत करतात. लोकांचं डोनेशेन आणि त्यांचं ‘सायकलिंग फॉर हुमॅनिटी’चं टी-शर्ट विकून त्यांना या कामासाठी थोडाफार पैसा उभारता येतो. रोहनच्या कामाची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्यानंतर अनेकांनी आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेकांनी रोहनच्या कामांचं कौतुक केलं.
रोहन सारखे अनेक लोक आज लोकांची मदत करत आहेत. याआधी देखील आम्ही अशा लोकांची माहिती तुमच्या पर्यंत पोहोचवली आहे. लॉकडाऊन काळात गरिबांच्या मदतीसाठी अनेक लोक पुढे आले. कोरोना संकट काळात अनेक दयाळू माणसांचे चेहरे आपल्याला बघायला मिळाले. अशा मदत करणाऱ्या अवलियांची चर्चा व्हावी आणि त्यांच्या कामांचं स्वागत होणं जरुरीचं आहे, जेणेकरुन आणखी काही लोकांमध्ये समाजकार्याप्रती गोडी निर्माण होईल म्हणून आम्ही तुम्हाला अशाप्रकारची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो.
हेही वाचा : चांगली बातमी! Women’s Day लाच सोने झाले स्वस्त; पटापट तपासा तोळ्याचा भाव