मुस्लिम बापाकडून लेकीच्या लग्नात हिंदूंसाठी खास निमंत्रण; सर्वांकडूनच होतोय कौतुकाचा वर्षाव
उत्तर प्रदेशातील अमेठी येथील एका मुस्लिम कुटुंबाने आपल्या मुलीच्या लग्नासाठी हिंदूंच्या प्रथेप्रमाणे लग्नपत्रिका छापल्या. या अनोख्या लग्नपत्रिकेने सर्वांचे लक्ष वेधले आहे.तसेच हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि सहिष्णुतेचे एक उत्तम उदाहरण समोर आले आहे.
लग्न म्हटलं की खरेदी, जेवणाचा मेन्यू, स्थळ वैगरे हे सगळं नंतर येतं आधी येते ती लग्नपत्रिका. कारण लग्नपत्रिकाच तर असते लग्नाच्या सुरुवातीचं आकर्षण. तसं पाहायला गेलं तर लग्नपत्रिकेत कोणाची नावे आहे नाहीत यावरून नेहमीच वाद होत राहतात. पण गेल्या दिवसांमध्ये अशी एक लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे. त्याबद्दल सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे. ही लग्नपत्रिका पाहून अनेकांच्या भुवया वर गेल्या.
मुलीच्या लग्नाचं कार्ड व्हायरल
यूपीच्या अमेठीमध्ये एका मुस्लीम कुटुंबातील मुलीच्या लग्नाचं कार्ड सध्या खूप चर्चेत आहे. ही लग्नपत्रिका चर्चेचा विषय होण्याचे कारण म्हणजे त्यावर छापलेला फोटो. ज्यांनी हा फोटो पाहिला त्यांना आश्चर्य वाटलं. त्याचं झालं असं एका मुस्लीम मुलीच्या लग्नपत्रिकेवर चक्क हिंदू देवी-देवतांचे फोटो होते त्यामुळे सर्वांनाच प्रश्न पडला की करण्यामागेच कारण काय?
या मुलीच्या घरच्यांनी हिंदू रीतीरिवाजानुसार लग्नासाठी कार्ड छापले आहे. कार्डच्या सर्वात वर एका बाजूला गणपती, तर दुसऱ्या बाजूला श्रीकृष्ण असल्याचे पाहायला मिळते. लग्नपत्रिकेत वधू-वर आणि नातेवाईकांची नावे मुस्लीम आहेत. पण लग्नाच्या कार्डवर संपूर्ण हिंदू देवतांचा फोटो दिसत आहे. लग्नाची तारीख ८ नोव्हेंबर असून पत्ता राजा फत्तेपूरच्या अलादीन गावाचा आहे.
लग्नपत्रिकेवर हिंदू देवी-देवतांचे फोटो छापण्याचे कारण?
दरम्यान हे लग्न काल म्हणजे 8 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडलं,. सायमा बानो असं या मुलीचे नाव असून तिचे लग्न सेनपूर पोस्ट सोथी महाराज गंज रायबरेली येथील रहिवासी इरफान पुत्र अब्दुल सत्तार याच्याशी झालं. या व्हायरल लग्नपत्रिकेबाबत मुलीचे वडील शब्बीर ऊर्फ टायगर आणि मुलगा रमजान यांना विचारले असता त्यांनी याबाबत खुलासा केला आहे,
ते म्हणाले की,”मी माझ्या हिंदू बांधवांना आमंत्रण देण्यासाठी हिंदू रीतीरिवाजानुसार लग्नाचे कार्ड छापले आहे. राजापूर आणि फत्तेपूर गावात अनेक ठिकाणी आम्हाला हिंदू बांधवांना निमंत्रित करावे लागले, म्हणून आम्ही विचार केला की त्यांच्यासाठी हिंदू रीतीरिवाजांनुसार कार्ड का छापू नये, आम्ही कुटुंबातील नातेवाईक आणि मुस्लिमांसाठी उर्दूमध्ये कार्डही छापले होते. आमच्या मुलीच्या लग्नाला हिंदू बांधवांना आमंत्रित करण्यासाठी आम्ही असे कार्ड छापले” असं म्हणत त्यांनी हिंदू रितीप्रमाणे लग्नपत्रिका छापण्याचे कारण सांगितले . दरम्यान हिंदूंच्या स्वागताचा कार्यक्रम एक दिवस अगोदर ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
हिंदू मुस्लिम एकतेचे आदर्श उदाहरण
मुस्लिम विवाहाच्या हिंदू परंपरेनुसार छापण्यात आलेल्या या कार्डमुळे समाजात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे उदाहरण नक्कीच समोर आले आहे. हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश देणारे हे लग्नकार्ड व्हायरल होत आहे आणि त्याचे कौतुकही होतं आहे.