माकडांना नियंत्रित करण्यासाठी नवीन आयडिया! IPS नवनीत सिकेरा यांची फेसबुक पोस्ट व्हायरल
माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी तर खास यंत्रणा ठेवावी लागते. आयपीएस अधिकारी नवनीत सिकेरा (IPS Navniet Sekera) यांची यासंदर्भातली एक फेसबुक पोस्ट व्हायरल होतीये.
पर्यटनस्थळी माकडांचा (Angry Monkey) त्रास होणं हा एक वेगळा विषय आहे. आपण फिरायला जावं आणि तिथे माकडांची टोळी असावी. बरीच अशी ठिकाणं आहेत जिथे माकडांनी हैदोस मांडून ठेवलाय. माथेरान, लोणावळा, महाबळेश्वर जिथं बघावं तिथे माकडं. बरेचवेळा व्हिडीओ व्हायरल होतात. ज्या व्हिडीओमध्ये माकड पर्यटकांच्या हातातून खाण्याच्या गोष्टी हिसकावून घेत असतो. कधी नखांनी ओरबाडून काढलेले व्हिडीओ समोर येतात, कधी पर्यटकांची बॅग पळवल्याचे व्हिडीओ समोर येतात. माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी तर खास यंत्रणा ठेवावी लागते. आयपीएस अधिकारी नवनीत सिकेरा (IPS Navniet Sekera) यांची यासंदर्भातली एक फेसबुक पोस्ट व्हायरल होतीये. ज्यात ते माकडांना नियंत्रित करण्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगतायत. या कामगिरीसाठी फौजफाट्याची गरज नाही असं सांगणारी ही व्हायरल पोस्ट (Facebook Viral Post)आहे तरी काय बघुयात…
माकडाला नियंत्रणात ठेवण्यासाठी नवी युक्ती
आयपीएस अधिकारी नवनीत सिकेरा आपल्या फेसबुक पोस्टवर सांगतात.” माझ्या वाचण्यात आलंय की, 93% संभाषण हे नॉन वर्बल असतं. म्हणजे 93% गोष्टी न सांगताच समजतात. इकडे पीटीसी उन्नावमध्ये भरपूर माकडं आहेत, माकडांना हुसकावून लावण्यासाठी एका होमगार्डला लाठ्याकाठ्या घेऊन कामाला लावण्यात आलं होतं.”
नवनीत सिक्वेरा पुढे लिहितात, “जेव्हा मी याचं कारण विचारलं तेव्हा मला सांगण्यात आलं, माकडं खूप बदमाश असतात, ते चावतात. सगळ्यात पहिल्यांदा मी त्या होमगार्डची ड्युटी बंद केली. आता रोज संध्याकाळी माकडांची टोळी येते. खूप आरामात चणे खाते, केळी खाते आणि शांतीत परत निघून जाते. आजपर्यंत कुठल्याही माकडाने त्रास दिलेला नाही.”
“चित्रांमध्ये दिसणारे माकड हा टोळीचा मुखिया आहे. तो सर्वात बलवान आहे. तो माझ्या जवळ आला की मला कळतं त्याला काय हवंय. इथे मी त्याला शरबत देतोय तोही ते शरबत शांतपणे पितोय. एखाद्याकडे प्रेमाने संपर्क करा, आदराने बघा. तुम्हालाही आदर मिळेल. लक्षात ठेवा आदर बोलण्यात नसतो, नजरेत असतो.”