95 वर्षापूर्वीचा पासपोर्ट व्हायरल, कसा होता पासपोर्ट?; व्हॅलिडिटी किती?
पासपोर्ट ही आपली ओळख आहे. कोणत्याही देशात गेल्यानंतर पासपोर्ट हेच आपलं आयडेंटीटी कार्ड असतं. पासपोर्ट शिवाय जगातील बहुतेक देशात प्रवेश मिळत नाही. पण जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो तेव्हा आपला पासपोर्ट कसा होता हे माहीत आहे काय? सध्या ब्रिटिश भारतातील एक पासपोर्ट वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून तुम्हालाही नवल वाटेल. 20-30 वर्षापूर्वीचा नाही तर तब्बल 95 वर्षापूर्वीचा हा पासपोर्ट आहे.
नवी दिल्ली | 10 डिसेंबर 2023 : आज जग संपूर्ण बदलून गेलं आहे. अनेक तंत्रज्ञान हातात आलं आहे. त्यामुळे आपल्याला बसल्या जागी सर्व माहिती मिळते. पूर्वी एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासाठी साधनं नसायची. अनेकदा पायीच जावं लागायचं. त्यामुळे त्या गावात मुक्काम करावा लागायचा. पण आता जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाणं आणि येणं सहज शक्य झालं आहे. ज्या गोष्टी कधी काळी स्वप्नवत होत्या, त्या आज प्रत्यक्षात उतरल्या आहेत. आज जग बदललं असलं तरी जुन्या गोष्टींचं महत्त्व कमी झालेलं नाही. कारण त्या जुन्या गोष्टीतूनच नव्या गोष्टींचा डोलारा उभा राहिलेला आहे.
पासपोर्ट आजही लोकांसाठी मोठं डॉक्यूमेंट आहे. पासपोर्ट नसेल तर जगात कुठेही फिरता येत नाही. त्यामुळे पासपोर्ट ही गरज बनली आहे. 95 वर्षापूर्वी पासपोर्ट कसा दिसत होता हे माहीत आहे का? तुम्हाला जर माहीत नसेल तर या पासपोर्टशी संबंधित एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ब्रिटिश राजमध्ये पासपोर्ट कसा दिसत होता हे दिसून येतं. भारताला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं. त्यापूर्वी आपल्या देशावर ब्रिटिशांचं राज्य होतं. त्यामुळे त्याकाळी पासपोर्ट ब्रिटिश सरकारकडून जारी केला जात होता.
इंडियन एम्पायर…
व्हायरल झालेल्या या पासपोर्टवर ब्रिटिश इंडियन पासपोर्ट असं लिहिलंय. इंडियन एम्पायर असंही त्यावर लिहिलंय. त्यावर ब्रिटिश सरकारचं चिन्ह आहे. 1928मध्ये एका व्यक्तीला दिलेला हा पासपोर्ट आहे. ही व्यक्ती ब्रिटिश सरकारमध्ये क्लर्क म्हणून नोकरीला होती. त्याचं नाव सैय्यद मोहम्मद खलील रहमान शाह असं आहे. या पासपोर्टवर त्या व्यक्तीचं नावही आहे. त्यावरून त्याकाळातील लोकांचा पेहराव कसा होता हेही दिसून येतं. या पासपोर्टवर 1928 ते 1938 असं लिहिलंय. त्यावरून पासपोर्टची व्हॅलिडिटी दहा वर्षाची असल्याचं स्पष्ट होतं.
गोल्डन इरा
या पासपोर्टचा फोटो इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला आहे. vintage.passport.collector नावाने असलेल्या अकाऊंटवर हा फोटो अपलोड झाला आहे. हा फोटो पाहून अनेकांनी त्याला लाइकही केलं आहे. या अकाऊंटवर अनेक पासपोर्ट आहेत. अनेक देशांचे पासपोर्ट आहेत. हे सर्व जुने आणि दुर्मीळ पासपोर्ट आहेत. पासपोर्टचा खजिनाच आहे असं म्हटलं तरी चालेल. हे पासपोर्ट पाहून लोकांनी त्यावर कमेंटचा पाऊस पाडला आहे. काहींनी तर हे पासपोर्ट पाहून गोल्डन इरा… अशी कमेंटही दिली आहे.