Viral Video: एकाच पायावर 2 किलोमीटर चालत! कशासाठी? शिक्षणासाठी!,”बन्दे हैं हम उसके, हमपे किसका ज़ोर?”
आपल्याच देशातील आपलेच अनेक विद्यार्थी अजूनही शाळेत पायी जातात यासारखं दयनीय काहीच नाही. विद्यार्थ्यांची परिस्थिती किती वाईट आहे हेच दाखवणारा एक व्हिडीओ समोर आलाय.
हंदवारा, जम्मू काश्मीर: काही दिवसांपूर्वी नॅशनल अचिव्हमेंटचा एक सर्व्हे (National Achievement Survey 2021) समोर आला होता ज्यात भारतातील 3.4 दशलक्ष विद्यार्थी सहभागी झाले होते. आम्हाला शिक्षणासाठी योग्य सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. डिजिटल माध्यमांची (Digital Platforms) बोंब आहे. कोरोना महामारीच्या काळात शिक्षणाचे हाल झाले, ऑनलाइन शिक्षणात अभ्यास करायला अनेक अडचणी येतात शिक्षकांच्या मदतीने अभ्यास चांगला होतो असं विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं. पण या सगळ्या सर्व्हेमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली जी अत्यंत दुर्दैवी होती ती म्हणजे भारतातील सुमारे 48 टक्के विद्यार्थी आजही पायीच शाळेत जातात. आज आपण शिक्षणाला कुठे कुठे घेऊन जायची भाषा करतो पण आपल्याच देशातील आपलेच अनेक विद्यार्थी अजूनही शाळेत पायी जातात यासारखं दयनीय काहीच नाही. विद्यार्थ्यांची परिस्थिती किती वाईट आहे हेच दाखवणारा एक व्हिडीओ समोर आलाय. ज्यात एक अपंग (Specially-abled boy)मुलगा शाळेत तब्बल 2 किलोमीटर चालत जातोय. या मुलाला एकच पाय आहे आणि चक्क एकाच पायावर आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी हा मुलगा 2 किलोमीटर इतकं अंतर पायी पूर्ण करतोय. कशासाठी? शिक्षणासाठी!
व्हिडीओ वायरल
या मुलाची मेहनत खूप कौतुकास्पद आहे. या मुलाचं नाव परवेझ आहे. मुलगा म्हणतो,” मला माझ्या आयुष्यात काहीतरी मिळवायचं आहे. इथले रस्ते अजिबातच चांगले नाहीत. जर मला कृत्रिम पाय मिळाला तर मी चालू शकेन.” अपंग परवेझ आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शरीर बॅलन्स करत करत एका पायावर अक्षरशः 2 किलोमीटर चालत जातो. त्याचं कौतुक करावा की आपल्या कडच्या शिक्षण पद्धतीचं वाईट वाटून घ्यावं असा प्रश्न लोकांना पडतो. हा व्हिडीओ जम्मू काश्मीरच्या हंदवारा मधला आहे.
#WATCH| Specially-abled boy walks to school on one leg to pursue his dreams in J&K’s Handwara. He has to cover a distance of 2km while balancing on a one leg
Roads are not good. If I get an artificial limb,I can walk. I have a dream to achieve something in my life, Parvaiz said pic.twitter.com/yan7KC0Yd3
— ANI (@ANI) June 3, 2022
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021
नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे 2021मध्ये सहभागी झालेल्या भारतातील 3.4 दशलक्ष विद्यार्थ्यांपैकी 38 टक्के विद्यार्थ्यांचा असं म्हणणं आहे की महामारीच्या काळात त्यांना शिक्षण सुरू ठेवणे अत्यंत कठीण होते. या सर्वेक्षणात तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. भारतातील सुमारे 48 टक्के विद्यार्थी आजही पायीच शाळेत जातात, असेही या पाहणीत स्पष्ट झाले आहे. या सर्वेक्षणानुसार, सुमारे 80 टक्के विद्यार्थ्यांना असे वाटतं की, शिक्षकांच्या मदतीने आपण शाळेत गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे शिकू शकलो असतो.