पुणे | 14 ऑगस्ट 2023 : पुणे शहरात प्रचंड वाहतूक आहे. देशात सर्वाधिक वाहनांची संख्या पुणे शहरात आहे. यामुळे प्रदूषणाची पातळी पुण्यात वाढली आहे. आता जवळपास प्रत्येक पुणेकरांकडे दोन गाड्या आहेत. परंतु सायकल मात्र नाही. आता अनेक घरांत फक्त मुलांसाठीच सायकली आहेत. त्यामुळेच सायकलने प्रवास करणारा पुणेकर मिळणे अवघडच झाले आहे. पुणे शहरात सायकलस्वारांसाठी काही रस्त्यांवर सायकल ट्रॅक तयार केला गेला. परंतु या ट्रॅकवर सायकली दिसत नाही. त्यामुळे गाड्यांची पार्किंग या ठिकाणी असते. या सर्व प्रकारात पुणे शहरातील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पुणे शहरातील ८० वर्षीय तरुण असलेल्या आजीबाईचा हा व्हिडिओ आहे. ज्या रस्त्यांवर चालणे अवघड असते त्या रस्त्यांवर या आजीबाई साडी परिधान करुन सायकलने प्रवास करत आहे. व्हिडिओ शुट करणारे आजीबाईंना तुम्ही किती वर्षांच्या तरुणी आहेत? कुठे जाणार आहेत? असे प्रश्न विचारताना दिसत आहे. या वयात आजीबाई सायकल चालवत असल्याबद्दल रस्त्यावरील अनेकांना आश्चर्य वाटत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
पुणे शहरातील ८० वर्षांची 'तरुणी', पाहा कशी सुसाट जाताय सायकलवर#Pune #PuneNews pic.twitter.com/xaaZxP087C
— jitendra (@jitendrazavar) August 14, 2023
पुणे शहरात सुमारे तीस वर्षांपूर्वी सायकल प्रवासासाठी महत्वाचे वाहन होते. अनेक जण आठ, दहा किलोमीटरपर्यंतचा प्रवास सायकलने करत होते. परंतु त्यानंतर वाहनांची संख्या वाढत गेली. प्रत्येक घरात असणाऱ्या सायकलची जागा दुचाकीने घेतली. यामुळे शहरातील प्रदूषणही वाढले. आता किशोरवयीन मुले नियम तोडून सायकल ऐवजी दुचाकी वाहन चालवताना दिसतात. त्यावेळी ८० वर्षीय तरुण आजीबाईंचा सायकल प्रवास निश्चित कौतूकास्पद आहे.