रेल्वेला मनस्ताप… ट्रेनमध्ये अश्लील व्हिडीओ पाहू नका, रेल्वेचं फर्मान; सोशल मीडियात का होतेय चर्चा?
ब्रिटनमधील रेल्वेने प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वेत अश्लील व्हिडीओ किंवा सिनेमे पाहू नका. त्याचा इतर प्रवाशांना त्रास होतो. हा कंटेंट तुम्ही घरी जाऊन पाहा, असं रेल्वेने म्हटलं आहे.
लंडन : ब्रिटनच्या एका रेल्वे कंपनीने आपल्या प्रवाशांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. रेल्वेत अश्लील व्हिडीओ पाहू नका, अशा सूचनाच रेल्वेने दिल्या आहेत. प्रवाशांकडून रेल्वेतच अश्लील कंटेट पाहिला जात असल्याने होणाऱ्या मनस्तापातून रेल्वेने या सूचना दिल्याचं सांगितलं जात आहे. प्रवाशांना असं काही पाहायचंच असेल तर त्यांनी घरी जाऊन पाहावं. तिथे कुणाच्याही प्रायव्हसीचं उल्लंघन होणार नाही, असं रेल्वेने म्हटलं आहे. मात्र, रेल्वेने हे आश्चर्यकारक फर्मान सोडल्याने आता सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नॉदर्न रेल्वे कंपनीने हे फर्मान सोडलं आहे. या कंपनीने फ्रेंडली वायफायशी करार करून त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकात आणि ट्रेनमध्ये वायफायची सुविधा दिली आहे. मात्र, प्रवासी या वायफायचा चुकीचा वापर करत आहेत. ट्रेनमध्ये सर्रासपण अश्लील सिनेमे पाहत आहेत. त्यामुळे इतर प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे रेल्वेने थेट प्रवाशांना सूचनाच दिल्या आहेत.
प्रवास करताना ट्रेनमध्ये अश्लील सिनेमे पाहू नका. आपत्तीकारक जोक्स वाचू नका. वाद होईल अशा मुद्द्यांवर चर्चा करू नका, वादग्रस्त मुद्दे चर्चेत आणू नका, असहज आणि व्हल्गर वाटेल असं कोणतंही कंटेट मोबाईलमधून उघडू नका, अशा सूचनाच रेल्वेने प्रवाशांना दिल्या आहेत. मात्र, रेल्वेेच्या या सूचनेनंतर सोशल मीडियातून चांगलीच चर्चा होत असून त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. काही लोकांच्या मते रेल्वेचा निर्णय योग्य आहे, तर काहींनी या निर्णयाला विरोध केला आहे.
घरी जाईपर्यंत कळ सोसा
आमच्या ट्रेनमधून प्रत्येक वर्षी लाखो लोक प्रवास करत असतात. या प्रवाशांना सुरक्षित आणि सहजपणे इंटरनेट सुविधा देणे ही आमची जबाबदारी आहे. काही कंटेट प्रत्येकाने पाहावा किंवा ऐकावा असा असत नाही. खासकरून लहान मुलं हा कंटेट पाहू शकत नाही. अशावेळी जो कंटेट आमच्या कार्यक्षेत्रासाठी उपयुक्त नाही, तो प्रवाशांनी पाहू नये. घरी जाईपर्यंत प्रवाशांनी कळ सोसावी आणि घरी गेल्यावर असा कंटेट पाहावा, असं नॉदर्न रेल्वेचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर ट्रेशिया विलियम्स यांनी सांगितलं.
कोणताही फिल्टर नाही
आम्ही कमीत कमी फिल्टर लावून इंटरनेट सेवा देत असतो. त्याचा काही प्रवासी गैरफायदा घेत आहेत. ट्रेनमध्ये अश्लील कंटेंट पाहत आहेत. त्यामुळे महिला आणि लहान मुलांची गैरसोय होते. त्यामुळेच अश्लील कंटेट रेल्वेत ओपन करू नका, असं सांगण्याची वेळ आली आहे, असं फ्रेंडली वायफायकडून सांगण्यात आलं.
महिला झाली होती त्रस्त
एका महिलेला ट्रेनमध्ये परेशान करण्यात आलं होतं. त्यानंतर नॉदर्न रेल्वेने या सूचना दिल्या आहेत. 34 वर्षीय एग्निज्का नारसीन्का ही महिला 4 एप्रिल रोजी रात्री 11 वाजता स्कॉट रेल्वे सर्व्हिसमधून एकटी प्रवास करत होती. तेव्हा एका प्रवाशाने ग्लासगो आणि लनार्क रेल्वे स्थानकात तिला त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने एग्निज्काचा फोटो काढला आणि तिला अश्लील हातवारेही केले. मात्र, दुसऱ्या प्रवाशांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तो तिथून पळून गेला. या प्रकराची तक्रार झाल्यानंतर रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.