पुणे: कधी परीक्षेचं टेन्शन (Exam Tension) आलंय का? हा पण काय प्रश्न आहे, परीक्षा म्हटलं तर अंगावर काटा उभा राहणारच. काही काही लोकांना नुसतं पास व्हायचं पण टेन्शन असतं बरं का. परीक्षेच्या निकालाचे पण अजब गजब किस्से असतात. कधी कुणी एकाच मार्काने नापास (Fail In SSC Exam) काय होतो, कुणाचा एकच विषय काय राहतो तर कुणी नुसत्या एकाच विषयात काय पास होतो. जितक्या व्यक्ती तितके किस्से! दहावीचा रिझल्ट नुकताच जाहीर करण्यात आलाय. ह्यातला एक किस्सा बराच चर्चेत आहे. तुम्ही म्हणाल असून असून कायच असेल नाही का…! किस्सा असा आहे कि एक मुलगा सगळ्या विषयात नापास होता होता वाचलाय! भाऊंना सगळ्या विषयांत 35 गुण (35 Mraks In Every Subjects) मिळालेत. सगळ्याच विषयांत दादा काठावर पास झालेत. आहे ना वाढीव किस्सा?
शुभम जाधवला मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सामाजिक शास्त्र अशा सगळ्या विषयांत प्रत्येक 35 गुण मिळालेले आहेत. ३५ टक्के गुण मिळवून शुभम जाधवने एक वेगळाच किस्सा सगळ्यांसमोर आणलाय. महत्त्वाचं काय? पास झालाय. दहावीत नापास होऊन सुद्धा आयुष्यात नंतर ज्यांनी नाव काढलं असे खूप लोकं आहेत. शुभम जाधव सुद्धा असंच काहीसं करेल अशी आशा आहे!
पुणे तिथे काय उणे? पुण्यात काय बुआ कशाची कमी नाही. इथे राहणाऱ्या लोकांची जगात चर्चा आहे असं बरेचदा मस्करीत म्हटलं जातं. विद्येचं माहेघर असणारं पुणे शिक्षणात अव्वल! कुठलाही रिझल्ट असो पुणे शहराचा रिझल्ट हा कधीच यादीत शेवटी दिसणार नाही, अहो असं काय करता विद्येचं माहेरघर नव्हे का? दुसऱ्या राज्यातून, दुसऱ्या देशातून मुलं पुण्यात शिकायला येतात. शुभम हा पुण्याचाच रहिवासी आहे. तो पुण्यात गंज पेठेत राहतो. शुभम हा पुण्यातील रमणबाग शाळेचा विद्यार्थी आहे.